बुलडाणा : आजच्या स्पर्धेच्या युगात जिद्द, चिकाटी ठेवली आणि खूप मेहनत घेतली की यश नक्की मिळते, उत्तम उदाहरण मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथील वैभवने दाखवून दिले आहे. वडील शिवणकाम करणारे आणि घरची परिस्थिती तशी नाजूकच. परंतु वैभवने खडतर परिस्थीतही सीए (सनदी लेखापाल) मध्ये उत्कृष्ट यश प्राप्त करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
आपला मुलगा काही तरी शिकून मोठा व्हावा, हे स्वप्न प्रत्येकच पालकाचं असते. मगं तो पालक गरीब, असो किंवा श्रीमंत. परंतु त्या स्वप्नाला सत्यात उतरविण्याचं मोठ काम हे त्या पाल्याच्या हातात असते. पालकाने कितीही पैसे खर्च करून आपल्या मुलाला मोठ्या शाळेत घातलं, तरी सुद्धा त्या मुलाच्या हातातच त्याच यश असते. मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख या छोट्याशा खेड्यात गजानन देशमुख हे शिवणकामचा (टेलरिंग) व्यवसाय अनेक वर्षांपासून करतात. त्यांचा मुलगा वैभव याने ग्रामीण भागात शिक्षण घेऊनसुद्धा आपले ध्येय गाठले. वैभवला सुरूवातीपासून सीए (सनदी लेखापाल) होण्याचं स्वप्न होतं. परंतू घरची परिस्थिती हालाकीची असतानाही वडिलांनी मेहनत घेऊन त्याला शिकवलं. त्या मुलाने सुद्धा आपल्या परिस्थितीची जाण ठेवून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर सीए होण्याचे स्वप्न गाठले. त्यामध्ये त्याने उत्कृष्ट गुण प्राप्त करून यश मिळविले आहे.
एकाच वेळेस दोन्ही गटातून उत्तीर्ण
सनदी लेखापालचा निकाल १९ सप्टेंबर रोजी जाहीर झाला आहे. सनदी लेखापाल परीक्षेमध्ये गट एक आणि गट दोन असतात. यामध्ये बहुतांश विद्यार्थी हे एकावेळी कोणत्याही एकाच गटातून उत्तीर्ण होतात. मात्र वैभव देशमुख हा एकाचवेळी दोन्ही गटातून उत्तीर्ण झाला आहे. ही परीक्षा अत्यंत कठीण असून साधारणत: सहा ते सात टक्के निकाल लागल्याची माहिती आहे.
सर्व विषयात ४० पेक्षा अधिक गुण
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियामार्फत घेण्यात आलेल्या सीएच्या परीक्षेमध्ये गट एक आणि गट दोन या दोन्ही गटामध्ये सर्व विषयांमध्ये वैभवला ४० पेक्षा अधिक गुण प्राप्त झाले आहेत. खर्च व्यवस्थापन लेखा या विषयामध्ये त्याला ६० गुण मिळाले आहे.