चिखली (जि. बुलडाणा ) : मीटरभाडेच्या नावाखाली ग्राहकांना दीड ते दोनपट अतिरिक्त वीज बिले दिले असल्याचा आरोप करीत चिखली शहर शिवसेनेने येथील महावितरणच्या कार्यालयात अभियंत्यास घेराव घालून १५ दिवसांच्या आत वीज बिले कमी करून नियमाप्रमाणे बिले देण्याची मागणी ११ ऑगस्ट रोजी केली. शहरातील नागरिकांना दीड ते दोनपट वीज बिल आल्याच्या तक्रारी शिवसेना शहर प्रमुख नीलेश अंजनकर यांना प्राप्त झाल्यानंतर अंजनकर व शिवसेना पदाधिकार्यांनी नागरिकांसमवेत महावितरणचे कार्यालय गाठले व अभियंता दिनेश डहाके यांना याबाबत जाब विचारण्यासाठी घेराव टाकला. दरम्यान, अतिरिक्त बिलाबाबत विचारणा केली असता सध्याच्या बिलात मीटरभाडे वाढल्याचे अभियंता डहाके यांनी सांगितले. मात्र, बिलात मीटर भाडे म्हणून २0 रुपये अधिक करूनही बिलाचा ताळमेळ बसत नसल्याने महावितरण कंपनीकडून सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल करून मनमानीपणे बिले वसूल केल्या जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेऊन याठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली व १५ दिवसांच्या आत बिले कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नीलेश अंजनकर यांनी यावेळी दिला.
वीज अभियंत्यास शिवसेनेचा घेराव
By admin | Published: August 11, 2015 11:29 PM