लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्थानिक एका लॉजवर दोन महिलांकडून देहविक्री करवून घेणाºया दोघांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. हा प्रकार शनिवारी उशिरा रात्री शेगावात घडला. यामध्ये दोन महिला, लॉज व्यवस्थापकासह एकाचा समावेश आहे.
गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने शेगावातील भाग्यश्री लॉजवर छापा मारला. त्यावेळी तिथे लॉज व्यवस्थापक हुसेनखान असगर खान (२७) म्हाडा कॉलनी रा. शेगाव आणि नितीन अरूण कळंके (३३) रा. धनगर नगर, शेगाव यांच्यासह दोन पिडीतांना पकडण्यात आले. त्यांच्याजवळून ४ मोबाईल नगदी २३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी हुसेन खान तसेच नितीन कळंके यांच्या विरोधात भादंवि कलम ३, ४, ५, ७ अनैतिक प्रतिबंधक व्यापार अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा दाखल केला. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या आदेशावरून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वात एपीआय सचिन चव्हाण, पीएसआय मनोज सुरवाडे, संतोष माने, निलेश डाबेराव, चंद्रकांत बोरसे, नितीन भालेराव, प्रदीप मोठे, देवेंद्र शेलके, सुधाकर थोरात आदींनी ही कारवाई केली.
लॉज व्यावसायिकांमध्ये खळबळ!
उपविभागीय पोलिस अधिकाºयांच्या या धाडीमुळे स्थानिक पोलिसांचे पितळ उघडे पडले असतानाच, लॉज व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गेल्या वेळीही उपविभागीय पोलिस अधिकाºयांनी कारवाई करून शेगावातील सेक्स रॅकेट उघडकीस आणले होते. अशी कारवाई नियमित झाल्यास, शेगावातील अवैध व्यवसायांना निश्चितच आळा बसेल, अशी चर्चा आहे.