ब्रह्मानंद जाधव। बुलडाणा : जिल्ह्यात यावर्षी उन्हाळी पिकांचे १ हजार ८१० हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने नियोजन केले होते; यामध्ये तीन पट वाढ होऊन २९९ टक्के म्हणजे ५ हजार ४२० हेक्टरवर सूर्यफूल, भुईमूग, मका यांसह इतर उन्हाळी पिकांची पेरणी करण्यात आली आहे; मात्र तळपत्या उन्हाच्या झळा पिकांच्या मुळावर बसत असल्याने या पिकांचे नुकसान होत आहे. पाण्याची पातळी खालावल्याने सिंचन करणे शक्य होत नसल्यामुळे उन्हाळी पिकांना जगविणे अवघड झाले आहे.पाण्याची उपलब्धता पाहूनच यावर्षी उन्हाळी पिकांचे क्षेत्र वाढले. कृषी विभागाने यावर्षी सूर्यफूल, भुईमूग, मका यासह इतर उन्हाळी पिकांचे १ हजार ८१० हेक्टर क्षेत्रावर नियोजन केले होते; मात्र यामध्ये तीन पटीने वाढ होऊन सुमारे ५ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावर सूर्यफूल, भुईमूग, मका व इतर उन्हाळी पिकांची पेरणी झाली. त्यामध्ये जळगाव तालुक्यात सरासरी क्षेत्र २३० हेक्टर असून, ७२५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. संग्रामपूर तालुक्यात ४६० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ३४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चिखली तालुक्यात २० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १५१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बुलडाणा तालुक्यात १४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ८० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यात ४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मेहकर तालुक्यात २४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ८३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सिंदखेडराजा तालुक्यात नियोजन नसतानाही २३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लोणार तालुक्यात २२० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ३३७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खामगाव तालुक्यात ३५० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १८२० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. शेगाव तालुक्यात ३० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी कुठेच पेरणी झाली नाही. मलकापूर तालुक्यात ४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १५१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मोताळा तालुक्यात ४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ३०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नांदुरा तालुक्यात नियोजन नसतानाही ३५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे; परंतु मे महिना उजाडताच पाण्याची पातळी झपाट्याने खालावल्याने उन्हाळी पिकांवर जलसंकट निर्माण झाले आहे.सोसाट्याची उष्ण हवा, कोरडे हवामान यामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे जमिनीतली ओल इतर हंगामापेक्षा उन्हाळ्यात लवकर कमी होते. परिणामी, उन्हाळी पिकांना पाणी लवकर द्यावे लागते, तसेच पाळ्याही जास्त द्याव्या लागतात. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त पाणी द्यावे लागते; मात्र पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने व तपत्या उन्हामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान होत आहे.
तळपत्या उन्हाच्या झळा पिकांच्या मुळावर!
By admin | Published: May 10, 2017 7:18 AM