बुलडाणा : व्यक्त होण्यासाठी समाज माध्यमाचा अनेकजण वापर करतात. मात्र, या समाज माध्यमांचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे अंगलट येऊ शकते. कारण शांतता बिघडविणारी, जातीय तेड निर्माण करणाऱ्या पोस्टला तुम्ही कळत-नकळत लाईक, शेअर किंवा फॉरवर्ड केल्यास तुम्हाला जेलची हवा खावावी लागू शकते. तेव्हा स्क्रोलिंग करताना अशा पोस्टला न पाहिलेलेच बरे असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सध्या प्रत्येकांकडे स्मार्ट फोन आहे. त्यामध्ये दाबून डाटा असल्याने अनेकजण वेळ घालविण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियांचा वापर करतात. आता प्रत्येकाचेच सोशल मीडियावर अकाऊंट असल्याने संवादासाठी किंवा मित्रांच्या कनेक्टमध्ये राहण्यासाठी या माध्यमांचा वापर करतात. मात्र, या सोशल मीडियावर काही विघ्नसंतोषी, समाजभान नसलेल्यांचाही भरणा मोठ्या प्रमाणात आहे. हे सायबर गुन्हेगार काही व्हल्गर पोस्ट करून समाजात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, याच पोस्टला तुम्ही धर्माच्या किंवा जातीच्या नावाखाली फॉरवर्ड केल्यास तुमच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो.
मुलीनो डीपी सांभाळा
काही तरुणी समाज माध्यमांवर स्वत:ची डीपी ठेवतात. मात्र, सायबर गुन्हेगार हीच डीपी हेरून तिला विचित्र ग्रुप किंवा अश्लील पेजवर पोस्ट करतात. यामुळे त्या मुलींची बदनामी होते. याकडे तरुणींनी विशेष लक्ष देऊन डीपी ठेवताना स्वत:चा फोटो न ठेवता इतर निसर्ग सौंदर्य किंवा देवी-देवतांचे फोटो ठेवणे हिताचे ठरेल असाही सल्ला सायबर विभागाने दिला आहे.
समाजभान ठेवून नागरिकांनी अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, अनोळखी पेजला लाईक करू नये, व्हल्गर पोस्टला लाईकही करू नये. या बाबींचे पालन केल्यास तुम्ही सायबरदृष्ट्या सुरक्षित राहू शकता.
- विलासकुमार सानप, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर विभाग.