लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शहरातील मातंगपुरा वस्तीचे पुनर्वसन करण्यात आले असताना अद्यापही अनेकांनी येथील वास्तव्य सोडले नसल्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार ४ जून रोजी मातंगपुरा भागातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई पोलीस बंदोबस्तात पार पडली. शेगाव शहरातील मातंगपुरा वस्तीचे शेगाव विकास आराखड्यांतर्गत पुनर्वसन करण्यात आले असून, यासाठी म्हाडाने बांधलेल्या १७६ घरांपैकी १७३ घरांची लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात येऊन पुनर्वसन यादीमधील १३३ कुटुंबीयांना घर मिळाल्याचे प्रमाणपत्र व चाव्या देण्यात आल्या आहेत. यापैकी १२४ कुटुंब पुनर्वसित घरांमध्ये वास्तव्यास गेले हो ते. मात्र, उर्वरित कुटुंबीय मातंगपुरामध्येच वास्तव्यास असल्याने पुनर्वसन करून संपूर्ण जागेचा ताबा शासनाला मिळालेला नव्हता. या प्रकरणी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने ५ मे रोजी महसूल प्रशासन आणि पोलीस विभागास सदर जागेचा ताबा एका आठवड्याच्या आत घेण्याचा आदेश दिला होता. प्रशासकीय अडचणी सोडविल्यानंतर ३ जून रोजी संबंधित अधिकारी वर्गाने या परिसराची पाहणी केली होती. यानंतर ४ जून रोजी या भागातील अतिक्रमण हटवून जागा मोकळी करण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी बंदोबस्त अधिकारी रूपाली दरेकर यांच्यासह चार पोलीस निरीक्षक, २६ पीएसआय, २५ वाहतूक पोलीस, ७0 महिला पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच सुरक्षितता म्हणून रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची गाडीसुद्धा उपलब्ध ठेवण्यात आली होती. ही कारवाई उपविभागी महसूल अधिकारी मुकेश चव्हाण, नगरपालिका मुख्याधिकारी अतुल पंत, तहसीलदार गणेश पवार, नझुल कर्मचारी आदींच्या उपस्थि तीत करण्यात आली.
शेगावातील ‘ती’ जुनी घरे जमीनदोस्त
By admin | Published: June 05, 2017 2:29 AM