लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : चिमुकल्या मुलाला यातना देणा-या सुदामा नगर येथील त्या सावत्र बापाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बाल संरक्षण विभागाच्या अधिका-याने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. बाल संरक्षण विभागाचे अधिकारी अविनाश एकनाथ चव्हाण यांनी शहर पोलीस स्टेशनला याप्रकरणी तक्रार दिली आहे.
यवतमाळ येथील पायल बांगर या महिलेचे चेतन ढोक या व्यक्तीसोबत दुसरे लग्न झाले. पण त्यांना लग्नाआधी तीन वर्षाचा मुलगा होता. लग्नानंतर सुरवातीला पतीने मुलाचा चांगला सांभाळ केला मात्र काही महीन्यातच बापाने मुलाचा छळ करण्यास सुरुवात केली. हा मुलगा संसारात अडथळा वाटू लागल्याने त्याचा काटा काढण्याचा विचार सावत्र बापाच्या डोक्यात येवू लागले. त्यामुळे त्याची आई घरी नसतांना तो त्या चिमुकल्याच्या अंगावर डासांच्या पेटत्या अगरबत्तीने चटके देवू लागला. एवढेच नाहीतर या क्रुर बापाने डोळा आणि कान फुटेल एवढी मारहाण केली. मारहाणीचा हा प्रकार दररोज सुरु असायचा. दररोज बालकाचे किंचाळणे आणि हृदय हेलावेल असे रडणे शेजा-यांच्या कानावर पडू लागले. त्यामुळे घरात काहीतरी गडबड असल्याचे शेजारच्यांच्या लक्षात आले. काही जागृत नागरिकांनी हा प्रकार बालकल्याण समितीच्या पदाधिका-यांना फोनद्वारे सांगितला. त्याआधारे बालसंरक्षण विभागाचे अधिकारी अविनाश चव्हाण व त्यांच्या पथकाने शेगाव गाठून शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार डी.डी. ढाकणे यांच्या सहाय्याने २ फेब्रुवारीला त्या बालकाला नराधम बापाच्या तावडीतून सुटका केली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. अखेर याप्रकरणी मंगळवारी संध्याकाळी शेगाव शहर पोलिसांनी आरोपी चेतन ठोक याच्याविरुद्ध मुलास शारिरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी अ.प.क्र. ६८/१८ कलम ३२३, ३२४ भादवि. सह कलम ७५ बाल संरक्षण अधिनियम कायदा २०१५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास एपीआय भारती गुरबूले करीत आहेत.
चिमुकल्याचा मारण्याच होता कट बालकाची वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्या अंगावर कपाळापासून तळव्यापर्यंत मारहाणीच्या तब्बल ४७ खुणा आढळल्या आहेत. चावा घेतल्याच्या शरीरावर ५ खुणा दिसून आल्यात. पोलिसांनी बालकाला आईच्या संमतीने बाल सुधार गृहात पाठविले आहे.