लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाफेडमार्फत सुरू असलेल्या केंद्रावर १00 क्विंटलपेक्षा जास्त तूर विक्री करून शासनाची फसवणूक करणार्या चौघांना दुपारी अटक केली. शेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती केंद्रावर नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू असताना ज्ञानदेव वासुदेव घाटे रा. सांगवा यांनी १२0 क्विंटल, विश्वास नरहरी पाटील रा. झाडेगाव एकूण २२२ क्विंटल, बाळकृष्ण सुदामा गव्हाळे रा. झाडेगाव यांनी १00 क्विंटल, ज्ञानेश्वर श्रीराम पाटील, रा. झाडेगाव १00 क्विटल अशी एकूण ५४२ क्विंटल तूर गैरमार्गाने विकून २७ लाख ३७ हजार १00 रुपयांनी शासनाची फसवणूक केल्याचे गुन्हे शाखा बुलडाणा यांच्या चौकशीत निष्पन्न झाले. आरोपींनी त्यांचे अपेक्षित तुरीचे उत्पन्न असताना उत्पन्न जास्तीचे दाखवून खोटे हमीपत्र तूर विक्री करते वेळी सादर केले. खोट्या व बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक संबधितांनी केली. यासाठी त्यांना बाजार समिती प्रशासनाचे सहकार्य लाभले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग ठाणेदार जाधव यांनी शेगाव शहर पो.स्टे ला फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी किसन घाटे, विश्वास पाटील, बाळकृष्ण गव्हाळे, ज्ञानेश्वर पाटील या चौघांविरुद्ध अप.क्र.२४१/१७ कलम ४२0,४0९,४६५,४६८,४७१,३४ भादंवि अन्वये गुन्हे दाखल करून अटक केली. पुढील चौकशीसाठी चारही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. आरोपी हे कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव येथे संचालक पदावर असताना त्यांनी त्यांचे अपेक्षित तुरीचे उत्पन्न कमी असताना त्यांनी तुरीचे उत्पन्न जास्तीचे दाखवून खोटे हमीपत्र तूर विक्री करते वेळी सादर केले. आरोपी यांनी खोटे व बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक केली असल्याची फिर्याद यापूर्वीच शेगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनसुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
बाजार समिती संचालकही दोषी!या अगोदरसुद्धा बाजार समिती संचालक श्रीधर पाटील व नीलेश राठी, जगदीश राठी या व्यापार्यांनी २ ते २४ जानेवारी २0१७ दरम्यान गैरमार्गाने तूर विकून २६ लाख १५ हजार ९00 रुपयांची शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.