- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कोरोना विषाणू संक्रमनामुळे तब्बल आठ महिन्यांपासून बंद असलेले विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराजांचे मंदिर मंगळवारी पहाटे उघडले. मंदिर उघडणार असल्याचे समजताच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक सोमवारी सायंकाळीच शेगावी पोहोचले. मंगळवारी पहाटेच भाविकांची श्रींच्या मंदिरात गर्दी झाल्याचे दिसून आले. श्रध्दा... उत्कृष्ट नियोजन आणि शिस्त ही त्रिसुत्री मंगळवारी श्री गजानन महाराज संस्थानमध्ये हजारो भाविकांनी अनुभवली.निमित्त होते ते श्रींचे मंदिर तब्बल आठ महिन्यांनंतर उघडल्याचे. धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करून पूजा-अर्चा करण्यास शासनाने मुभा दिल्यानंतर तब्बल एक दिवस उशीरा म्हणजेच मंगळवारी पहाटे श्री गजानन महाराजांचे मंदिर उघडले. दर्शनासाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनी मंदिर उघडण्यापूवीच फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करीत प्रवेशद्वारावर हजेरी लावली. संस्थान कडून भाविकांच्या ऑनलाईन पासची तपासणी, थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. तसेच हात सॅनिटाईज केल्यानंतर भाविकांना अतिशय शिस्तीने दर्शनबारीत सोडण्यात आले. भाविकांच्या दर्शनासाठी संस्थानकडून विशेष व्यवस्था करण्यात आली. पहिल्याच दिवशी सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत जवळपास ८ हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.