अनिल गवई/गजानन कलोरे। लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन महो त्सवानिमित्त बुधवारी तीन लाखांवर भाविकांनी हजेरी लावली. दोन लाखांच्यावर भाविकांनी ‘श्रीं’च्या महाप्रसादाचा लाभ घेतला असून, अलोट गर्दीमुळे संत नगरी फुलून गेली होती. दोन लाखांच्यावर भाविकांनी श्रींच्या समाधीचे दर्शन यावेळी घेतले.संत गजानन महाराज मंदिरात कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी श्रींचे पूजन केले, तर महादेव मंदिर येथे विश्वस्त नीळकंठदादा पाटील यांच्या हस् ते, प्रकटस्थळी विश्वस्त प्रमोद गणेश यांनी केले. सीतामाता मंदिर येथे अशोक देशमुख, तर शीतलनाथ महाराज धर्मशाळेत विश्वस्त गोविंद कलोरे यांच्या हस्ते श्रींचे पूजन करण्यात आले. पालखी मार्गावर भाविकांच्यावतीने चहा, नास्ता, सरबत आणि पाण्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये श्री सद्गुरू सेवा समिती अग्रसेन चौक, श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थी व शिक्षकवृंद, युवाशक्ती नवदुर्गा उत्सव, लहुजी वस् ताद चौक मित्रमंडळ, गजानन निमखंडे काळेगाव, रायगड मित्र परिवार यांनी व्यवस्था केली होती. शेगाव-खामगाव मार्गावरही हनुमान मंदिरासह, वसंत महाराज अन्नकुटीमध्ये भाविकांच्या चहा-नास्त्यासह फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. संत गजानन महाराजांचे नामस्मरण आणि जयघोषाने शेगाव दुमदुमले होते.
प्रकट दिन महोत्सवात पोलिसांचीही बंदोबस्त ‘वारी’!संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त संत नगरी शेगाव येथे चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. ‘श्रीं’च्या पालखीसोबतही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, शेगावचे ठाणेदार डी.डी. ढाकणे यांच्यासह अनेक पोलीस यावेळी वारकरी झाले. या उत्सवात एएसपी, डीवायएसपी, सात पोलीस निरीक्षक, ३२ एपीपीए, ४२५ पोलीस कर्मचारी यांच्या विशेष कृती दल आणि बॉम्बशोधक पथकाचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
शाळा, महाविद्यालयांची दिंडी!संत गजानन महाराजांच्या नगर परिक्रमेमध्ये भाविकांसोबतच शेगावातील विविध शाळा, महाविद्यालयांच्याही दिंडी सहभागी झाल्या होत्या. यामध्ये श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, श्री गजानन महाराज इंग्लिश स्कूल दिंडी, नवोदय विद्यालयाच्या दिंडीचा सहभाग होता. यावेळी विद्या र्थ्यांसह शिक्षक आणि प्राध्यापकवृंद मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पावली खेळत भाविकांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले. श्रींची पालकी नगर परिक्रमा करून सायंकाळी श्रींच्या मंदिरात दाखल होऊन या ठिकाणी आरती झाली. टाळकरी यांचा रिंगण सोहळा होऊन श्रींच्या प्रकट दिन यात्रेची सांगता झाली.
मंदिरावर आकर्षक रोषणाई!विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या मंदिरावर संत गजानन महाराज मंदिर व्यवस्थापनाच्यावतीने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. संस् थानच्यावतीने भाविकांसाठी विविध सुविधा पुरविण्यात आल्या. ‘श्रीं’च्या दर्शनासाठी आलेल्या लक्षावधी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली. बुधवारी दोन लाखांवर भाविकांनी ‘श्रीं’च्या महाप्रसादाचा लाभ घेतला. यामध्ये साखर ३0 क्विंटल, गहू आटा २00 क्विंटल, तांदूळ ८0 क्विंटल, तूर डाळ ७0 क्विंटल, रवा २५ क्विंटल, खाद्यतेल ६0 डबे, डालडा ३0 डबे आदी साहित्याचा वापर करण्यात आला. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. दुपारी २ वाजता निघालेली पालखी सायंकाळी मंदिरात पोहोचली. यावेळी हजारो भाविकांनी पालखीचे स्वागत केले.