लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शेगाव आणि बाळापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मन नदी पात्राजवळील तयार झालेल्या दरडमधून भिंगी मातीचे अवैध उत्खनन सुरू असताना दरड कोसळल्याने २ मजूर मातीखाली दबल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेत नागरिकांच्या अथक परिश्रमानंतर मातीखाली पूर्णपणे दबलेल्या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यामध्ये भोरु देशमुख व कैसर देशमुख हे दोन्ही मजूर जखमी झाले असून, दोघांना रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. शेगाव तालुक्यातील मानेगाव आणि बाळापूर तालुक्यातील लोहारा शिवारातील मन नदीसह सर्व नदी-नाल्यांमधून भिंगी आणि रेतीचे अवैध उत्खनन दररोज सुरू आहे. रात्रंदिवस रेतीचा अवैध उपसा सुरू असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने रेती चोरट्यांची हिंमत वाढली आहे. परिसरातील अनेक रेती घाटांवरून विना रॉयल्टीची किंवा एकाच रॉयल्टीवर दिवसभर रेतीची वाहतूक सुरू असते. यामध्ये सोमवारी मानेगाव- लोहारा शिवारातील मन नदीच्या पात्रालगतचे भूभाग खोदून भिंगी माती काढण्याच्या प्रयत्नात दरड कोसळून भुरू बहेमूद देशमुख आणि कैसर देशमुख दोन्ही राहणार लोहारा हे मजूर मातीच्या ढिगार्याखाली पूर्णपणे दबले. दरड कोसळताच इतर मजुरांनी आरडाओरड केली असता, मानेगाव या गावातील नागरिकांनी घटनास्थळ गाठून अथक परिश्रमानंतर दबलेल्या मजुरांना काढले. दोघांची प्रकृती स्थिर असून, त्यांना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ गाठून दबलेल्या मजुरांना बाहेर काढले. मन नदीच्या पात्रातून मोठय़ा प्रमाणात रेतीचा उपसा होत असून, अहोरात्र होणार्या वाहतुकीने या परिसरातील रस्तेही उखडले आहेत. सर्व प्रकार बिनबोभाटपणे सुरू असताना महसूल प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.
तहसीलदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीया अपघातातील घटनास्थळ हे बाळापूर तालुक्यात येत असून, येथील तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या दुर्लक्षामुळेच अशी घटना तिसर्यांदा घडल्याने त्यांच्या विरुद्धही कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.