खामगाव: शौचालय निर्मितीच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने जिल्ह्यातील तालुक्यांनी वेग घेतला असला तरी २0१५-१६ या वर्षाच्या उद्दिष्टाचा विचार करता शेगाव व संग्रामपूर तालुक्यांनी शौचालय निर्मितीसोबतच शौचालयांच्या वापरामध्ये आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांनी चालू आर्थिक वर्षात प्राप्त उद्दिष्ट्याच्या ५0 टक्क्यांपेक्षा अधिक शौचालयांची निर्मिती करत स्वच्छ भारत अभियानास (ग्रामीण) प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, त्यामुळे जिल्हा राज्यात सध्या सातव्या स्थानावर असल्याची माहिती स्वच्छ भारत मिशन कक्षातील सूत्रांनी दिली. ऑक्टोबर २0१४ पासून जिल्ह्यात सध्या स्वच्छ भारत मिशनचा बोलबाला सुरू असून, २0१५-१६ या वर्षासाठी जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींमध्ये ३६ हजार ६२७ शौचालय निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी प्रत्यक्षात आतापर्यंंत १८ हजार ८0९ शौचालयांची निर्मिती भारत स्वच्छता मिशनअंतर्गत करण्यात आली आहे. एकूण उद्दिष्टाच्या ती ५१.३५ टक्के आहे. असे असले तरी तालुकानिहाय कामाच्या पूर्ततेची पाहणी केली असता आठ तालुक्यांनी ५0 टक्क्यांच्या वर उद्दिष्टपूर्ती केली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्हा हा शौचालय निर्मितीच्या बाबतीच राज्यात सध्या सातव्या स्थानावर असल्याचे जिल्हा परिषदेमधील संबंधित कक्षातील सूत्रांनी स्पष्ट केले. नगर जिल्हा प्रथम, अकोला द्वितीय, अमरावती तिसर्या, औरंगाबाद चौथ्या, बीड पाचव्या तर भंडारा सहाव्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता जिल्ह्यात ४६.२0 टक्केच नागरिक शौचालयाचा वापर करत असल्याचे समोर आले होते; मात्र यावर्षी जिल्ह्यातील २१८ गावात शौचालयांची निर्मिती झाल्याने ही टक्केवारीही आता ५0 टक्क्याच्या जवळपास पोहोचली आहे. त्यामुळे दीड ते दोन वर्षाचा या उपक्रमाचा विचार करता जिल्ह्यात सध्या समाधानकारक काम होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
शौचालय वापरात शेगाव, संग्रामपूर अव्वल!
By admin | Published: February 12, 2016 2:05 AM