लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : मागील चार ते पाच दिवसांपासून शेगाव तहसील कार्यालयातील दोन मुख्य संगणकाचे पासवर्ड हरविल्याने तहसील कार्यालयातील सर्व कामे ठप्प झाली असून अनेक नागरीकांचे जात व उत्पन्नासह विविध दाखले कॉम्प्युटरमध्ये अडकून पडले आहेत. याकडे तहसिलदारांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांच्या अडचणीत भर पडली आहे.येथील तहसील कार्यालयातील तहसिलदार यांच्या कॉम्प्युटरचे आणि उत्पन्नाच्या दाखल्याचे पासवर्ड मागील चार ते पाच दिवसांपासून गहाळ झाले आहे. त्यामुळे शेकडो नागरीकांचे जात आणि उत्पन्नाच्या दाखल्यांसह विविध प्रमाणपत्र या संगणकांमध्ये अडकून पडले आहेत. तहसिलदारांकडून सदर संगणकांचे पासवर्ड मिळविण्यासाठी कासवगतीने कार्य सुरू आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुका असून येत्या १५ सप्टेंबरला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे काही इच्छूक उमेदवारांनी सुध्दा शेगाव तहसिलमध्ये जातीचा दाखला मिळविण्यासाठी अर्ज केलेला असून त्यांचे सुध्दा दाखले पासवर्ड अभावी निघत नसल्याने त्यांची अडचण वाढली आहे. तहसील कार्यालयातील अधिकार्यांच्या बेजबाबदारपणाचा नागरीकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.
तहसीलमधील संगणकांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे संगणक बंद आहेत. मात्र ते पुन्हा सुरू करण्यासाठी सवरेतोपरी प्रयत्न सुरू आहेत. संगणकाचे पासवर्ड पुन्हा अँक्टीव्ह करण्यासाठी मुंबई कार्यालयात ई-मेलव्दारे माहिती पाठविण्यात आली असून लवकरच पासवर्ड प्राप्त करून नागरीकांना त्यांचे दाखले वितरीत केल्या जातील. - गणेश पवार, तहसिलदार