शेगाव - वेळोवेळी निवेदने देऊन ही दखल न घेतल्याने अखेर गुरुवारी 12 जुलै रोजी सकाळी धनगर नगर , जिनिंग फॅक्टरी परिसरातील नागरिकांनी अकोट रोडवर रास्ता रोको आंदोलन केले आहे.
रेल्वे लाईन क्रॉसिंग साठी अकोट-वरवट रोडवर उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. उड्डाणपूलाखाली धनगर नगर ,दुर्गा नगर, आईस फॅक्टरी, जय अंबे नगर ही रहिवासी वस्ती आहे. अकोट रोडवर उड्डाणपूलावरून येताना उतार आहे. उतार असल्याने वाहनांची गती तीव्र होते. त्यात अकोट रोडवर उताराच्या शेवटी तिन्ही बाजूंनी रस्ते आहेत. त्यामुळे रहिवाशांची ये-जा सुरू असते. अचानक गतीने येणारी वाहने दिसत नसल्याने अनेकवेळा अपघात घडले आहेत. यासंदर्भात जून महिन्यात सुध्दा सा. बां. विभागाला निवेदन देण्यात आले आहे. परंतु कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. म्हणून आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला. रास्ता रोकोची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले व आंदोलनकर्त्याची समजूत घालून आठ दिवसांत संबंधित विभागाकडून गतिरोधक बसविण्याची कारवाई होइल असे आश्वासनही देण्यात आले आहे. रास्ता रोको आंदोलनात किशोर चांदुरकर, सूर्यकांत कडाळे, कृष्णा कुंडलकर, मोहन सानप, संतोष कान्हेरकर, किशोर लांजूडकर, राम चांदूरकर व असंख्य नागरिक तसेच तरूण सहभागी झाले होते.