फहीम देशमुख लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : राज्यातील मोठ्या शहरांमध्ये स्वाईन फ्लूने कहर केलेला असून मोठ्या शहरातील हा आजार आता विदर्भात पोहचला आहे. पर्यटकांच्या पसंतीत प्रथम क्रमांकावर असलेल्या शेगाव शहराला स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे.बुलडाणा जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या संशयित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा जोर वाढल्याने स्वाईनचा धोका कमी होईल, असे वाटत असतानाच आता पावसाळा सुरु झाल्याने वातावरणात कमालीचा गारठा पसरला. परिणामी स्वाईन फ्लूला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्ह्यात स्वाईन फ्लू आजाराची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अनेक संशयित रुग्ण बरे झाले आहेत. दिवसेंदिवस स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यभर स्वाईनच्या संशयितांच्या संख्येत वाढ होत आहे. पावसामुळे हवेत वाढलेला गारठा स्वाईन फ्लूला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरणार आहे. बदलेल्या वातारवणामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे सर्दी-खोकला झालेल्या रूग्णांनी काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. दुसरीकडे शेगाव येथे अध्यात्म आणि विज्ञानाच्या पायावर उभा असलेला आनंदसागर पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक शेगावात पोहचत आहेत. लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे मागील आठवड्यात शेगाव हाऊसफुल्ल झाले होते. अशा परिस्थितीत इतर शहरातून आलेल्या एखाद्या रुग्णामुळे स्वाईन फ्लू या भागात ही पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.बुलडाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बुलडाणा शहरातील एका खाजगी रुग्णालयात ताप व सर्दी झालेले काही रुग्ण दाखल झाले होते. त्यांचे नमुने पुणे येथे तपासल्यानंतर पाच जणांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णांपैकी मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील प्रदीप निनाजी नारखेडे यांचा मृत्यू झाला. तसेच बुलडाण्यातील केशवनगरातील ठेकेदार मोहम्मद अफजल मो. नजीर यांचा औरंगाबाद येथे स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने एमआयटी हॉस्पिटल औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासोबतच सविता संजय चोपडे, राहुल चव्हाण यासह बारा जणांना या भीषण आजाराची लागण झाली आहे. जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या आजाराने कहर केला असून, दोघांचा मृत्यू, तर पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरजजिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण असून, त्यांचे नमुनेच पाठविण्यात आले नसल्यामुळे निदान होत नसल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे प्रशासन मात्र हात झटकत असून, स्वाइन फ्लूचे रुग्णच नसल्याचा दावा करीत आहे.असे असले तरी जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका सर्वात जास्त शेगाव शहराला आहे. याठिकाणी पर्यटक आणि राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता आरोग्य विभागाने वेळीच उपाय योजना करणे गरजेचे झाले आहे.