लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : महापूरामुळे कोल्हापुर आणि सांगली मधील जनतेच्या मदतीसाठी शेगावकरांनी पुढाकार घेतला आहे. सर्वच स्तरातून कपडे व साहित्याची मदत गोळा होत असून ही मदत संबधितांना पोहचवली जाणार आहे.महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जिवीत आणि वित्तहानि झालेली आहे. त्या परिसरातील जनजीवन उध्वस्त झाले असून तिथल्या लोकांना उभे राहणे कठीण झाले आहे. या ओढावलेल्या संकटातून त्यांना सावरण्याची मोठी गरज आहे. संपूर्ण देशभरातून सांगली-कोल्हापूरकडे मदतीचा ओघ वाहतोच आहे. माणसूकीच्या या प्रवाहात शेगावकरांचेही योगदान असावे या उद्देश्याने आज शहरात मदत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते संपुर्ण शहरातील दानशूरांनी सढळ हाताने ६५ हजार रूपयांची मदत केली. गांधी चौकातून प्रारंभ झालेल्या या रॅलीत विविध पक्ष, संघटना सहभागी झाल्या होत्या.गांधी चौकातून हि रॅली शिवाजी चौक, बाजार लाईन, भैरव चौक, लहूजी चौक. मदिर मार्केट मागार्ने फिरून भगतसिंग चौकात समाप्त झाली. शेगावकरांनी आपल्या संवेदनशीलतेचा परिचय यानिमित्ताने दिला आहे. ‘रडणाऱ्यांचे पुसण्यापेक्षा मोठे सत्कर्म असू शकत नाही’ अशा प्रकारच्या जनमानसातून उमटत आहे. वेदनांना मदतीच्या संवेदनांनी संपविण्यासाठी ही निधी देण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)
पूरग्रस्तांच्या मदतीला धावले शेगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 3:53 PM