लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : ओळख लपवून लॉजमध्ये राहत असलेल्या महिलेसह १२ युवक आणि ११ युवतींना पोलिसांनी रविवारी दुपारी ताब्यात घेतले. आठवडाभरापूर्वीच अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या पथकाने गेल्या आठवड्यात धाडसी कारवाई केली होती. त्यानंतर रविवारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी धाड टाकली असता काही लॉजवर युवक आणि युवती संशयास्पद आढळून आले. १६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीला पोलिसांकडून शेगाव येथील लॉजवर मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. यावेळी आठ लॉजवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ५0 ते ६0 युवक-युवतींना पकडण्यात आले. यापैकी २८ जणांवर कलम ११0, ११७ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, तर २५ ते ३0 युवक-युवतींना समजपत्र देऊन सोडण्यात आले होते. त्याचवेळी परिसरातील गोपाल गेस्ट हाउसवर पिटा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. यामध्ये संजय मोहड, गोपाल उमाळे रा.शेगाव तसेच चिखली येथील एका महिलेचा समावेश होता. रविवारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने पुन्हा शेगाव येथील काही लॉजवर छापा टाकला. यामध्ये १२ युवक, ११ युवतीसह एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, पीएसआय निखिल फटिंग, पीएसआय भास्कर तायडे, पीएसआय अजहर शेख, पोहेकाँ मिरगे, पोहेकाँ खुटाफळे यांच्यासह शेगाव शहर आणि ग्रामीण पोलिसांचा समावेश होता.
आठवडाभरात दुसरी कारवाई!शेगाव येथे आठवडाभरापूर्वी करण्यात आलेल्या धाडसी कारवाईनंतर रविवारी पुन्हा पोलिसांनी धाडी टाकल्याने अनेक लॉजमध्ये तारांबळ उडाली होती. दरम्यान, ओळख लपवून राहत असल्याने पोलिसांनी २४ जणांना ताब्यात घे तले. या कारवाईमुळे शेगाव शहरात खळबळ उडाली आहे.