बुलडाणा प्रादेशिक वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक रणजीत रघुवीर गायकवाड हे सोमवारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह बुलडाणा-खामगाव मांडणी शिवारात गस्तीवर होते. त्यावेळी जंगलात काही लोक अवैध वनचराई करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तेव्हा अधिकाऱ्यांनी मेंढ्या जप्तीची कारवाई सुरू केली व दोन जणांना ताब्यात घेऊन शासकीय वाहनात बसविले. त्यावेळी मेंढ्याच्या कळपाचा मालक मोतीराम रतन टिळे आला व काहीजण आले. त्यांनी वनविभागाच्या शासकीय गाडीवर हल्ला करून वाहनाच्या काचा फोडल्या, तसेच सहायक वनसंरक्षक गायकवाड व वनविभागाचे संतोष गिरनारे यांना मारहाण करून पकडण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनाही पळवून घेऊन गेले. या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात एसीएफ रंजीत गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवर हिवरखेड पोलीस ठाण्यात आरोपी मोतीराम रतन टिळे (रा. नांद्री ता. खामगाव) याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी (दि. १७) पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. यावेळी प्रादेशिक वनविभाग व वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी सोबत होते.