- नविन मोदे
धामणगांव बढे: दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी सिंदखेडच्या सरपंच विमल कदम व गावकरी एकत्र आले. ‘सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत’ गावकºयांनी दीड महिना अहोरात्र परिश्रम घेतले आणि चमत्कार झाला. तांत्रिकदृष्टया परिपुर्ण कामामुळे सिंदखेड गाव पहिल्याच पावसात पाणीदार बनले. सिंदखेड हे अवघे अडीच हजार लोक वस्तीचे गाव, परंतु नेहमीच पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष, यावर कायमस्वरुपी उपाय करण्यासाठी गावकरी एकत्र आले. त्याला निमित्त मिळाले वाटर कप स्पर्धेचे. गावकºयांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. पुर्वतयारी केली. जनजागृती केली व दीड महिना रखरखत्या उन्हात श्रमदान केले, त्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी यासाठी सुरुवातीपासून मार्गदर्शन केले व वेळोवेळी प्रत्यक्ष श्रमदानात सहभाग घेतला व वेळोवेळी येणाºया अडचणी सोडविण्यास मदत केली. गावकºयांनी श्रमदानातून ६५ एकरच्या परिसरात नाला खोलीकरण , शेततळे, सि.सि.टी. सलग समतलचर, कंपार्टमेंन्ट बंडिग, माती नाला बांधा कटुंर बांध यासारखी विविध कामे तांत्रिक दृष्टया परिपूर्ण व हायड्रोमार्कर लेव्हल नुसार पुर्ण केली. त्यामुळे पहिल्याच पावसात या परिसरात सर्वत्र पाणी पाणी दिसत आहे. गावकºयांचा उत्साह पाहुन हजारो हात श्रमदानासाठी पुढे आले होते.यासाठी आ.हर्षवर्धन सपकाळ, पाणी फाऊंडेशन, जिल्हा प्रशासन, विविध संघटना, शिवम प्रतिष्ठान कोल्हापूर, तसेच सिईओ डॉ.इंद्रजित देशमुख, जि.एस.टी.चे अधिकारी पाचरणे, महसुल विभाग, कृषी विभाग, भारतीय जैन संघटना यांचे सहकार्य व पाठबळ लाभले. १८ जूनच्या मध्यरात्री परिसरात जोरदार पाणी बरसला आणि १९ जूनच्या पहाटे सिंदखेड परिसर पाणीदार बनला. १९ जून रोजी सकाळी मोताळा गटविकास अधिकारी संजय पाटील यांनी सिंदखेड गावाला भेट दिली व समाधान व्यक्त केले.