लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा मुख्यालयी बस स्थानक, बाजार समिती व जिजामाता प्रेक्षागार मैदानजवळ अशा तीन ठिकाणी शिव भोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या या योजनेस २६ जानेवारीपासून सुरूवात करण्यात आली आहे.प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिजामाता प्रेक्षागार मैदानाजवळील राजर्षी शाहू महाराज पतसंस्थाद्वारा संचलीत भोजनालयात शिव भोजन थाळी योजनेला प्रारंभ करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस., अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाळे, अर्जुन बोरसे, विजय अंभोरे आदींची उपस्थिती होती. शिव भोजन थाळी योजनेची सुरूवात जिल्हा मुख्यालयी तीन ठिकाणी करण्यात आली. याव्यतिरिक्त बस स्थानक व कृषि उत्पन्न बाजार समितीचा यामध्ये समावेश आहे. शिव भोजन थाळी योजनेतंर्गत दुपारी १२ ते २ या वेळेत नाममात्र १० रूपये दरात थाळी मिळणार आहे. जेवणाचा दर्जा चांगला ठेवून स्वच्छता राखावी, अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केल्या. कार्यक्रमानंतर शिव भोजन थाळीचा आस्वादही मान्यवरांनी घेतला. याप्रसंगी संबंधित अधिकारी, भोजनालयाचे मालक, कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
बुलडाण्यात तीन ठिकाणी शिव भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 2:47 PM