लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्याशिवाय शेतकरी आर्थिक विवंचनेतून मुक्त होणार नाही. त्यासाठी शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या निमित्त शिवसेना उपनेते खा.अरविंद सावंत हे दोन दिवस बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर २ जूनला येत आहेत. २ जूनला घाटावर, तर ३ जूनला घाटाखालील विधानसभा मतदारसंघनिहाय ते आढावा बैठक घेणार आहेत. त्यानिमित्ताने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले आहे.शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क अभियान राबवून गावागावांतील शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे अर्ज भरून घेण्याचे काम शिवसंपर्क अभियान दरम्यान करण्यात येत आहे. हे कर्जमुक्तीचे अर्ज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते खा. सावंत हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. २ जूनला सकाळी ९ वा. मेहकर विधानसभा मतदारसंघात आढावा बैठक मेहकर येथील मारोती संस्थान जुने बस स्टँड येथे घेणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील योगीराज हॉटेलमध्ये, तर दुपारी ३ वाजता चिखली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आढावा चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हॉलमध्ये घेण्यात येणार आहे. दुपारी ४.३० वाजता बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक रेणुका मंगल कार्यालय येथे होणार आहे. तसेच घाटाखालील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी संत सावता मंगल कार्यालय संग्रामपूर येथे दुपारी १२ वाजता कार्यकर्त्यांची आढावा बैठक, तर दुपारी २ वाजता खामगाव येथे आणि मलकापूर विधानसभा मतदारसंघाची नांदुरा येथील एलआयसी हॉलमध्ये दुपारी ४ वाजता कार्यकर्त्यांची आढावा बैठक होईल. या बैठकीला खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रायमूलकर, आ. शशिकांत खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील उपस्थित राहणार आहेत. विधानसभानिहाय होणाऱ्या या आढावा बैठकीला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शहरप्रमुख, शाखाप्रमुख, किसान आघाडी, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले आहे.
कर्जमुक्तीच्या लढ्यासाठी शिवसंपर्क अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2017 12:30 AM