बुलडाणा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुंडन आंदोलने राज्यात सुरू झाली आहेत. तर, बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे क्रांतीदिनी झालेल्या आंदोलनादरम्यान शिवसेनेचे आ.डॉ.संजय रायमुलकर यांनीही मुंडन करत या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले होते, तर अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या आमदार नेत्यांसोबत मुंडन केले.
मराठा आंदोलनासाठी पहिला राजीनामा दिल्यानंतर आमदार हर्षवर्धन जाधव यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदार जाधव यांना भेट नाकारली होती. त्यानंतरही, मराठा आंदोलनासाठी मुंडन करण्याचा पहिला मान शिवसेनेच्याच आमदारा मिळाला आहे. जिल्ह्यातील मेहकर येथील शिवसेनेचे आ. डॉ.संजय रायमुलकर यांनी मुंडन करत या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर, मेहकरचे काँग्रेसचे नगराध्यक्ष कासम गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष निसार अन्सारी यांनीही मुंडन करून आंदोलनाला पाठिबां दिला आहे. विशेष म्हणजे मेहकर येथे मराठा आरक्षणासंदर्भात जवळपास तीन दिवस स्थानिक नागरिकांनी मुंडन आंदोलन केले होते. त्यानंतर क्रांती दिनाच्या जिल्हा बंद दरम्यान थेट आ.डॉ.संजय रायमुलकर यांनीही मुंडन करीत हे आंदोलन अधिक व्यापक केले आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथेही ग्रामस्थांनी मुंडन आंदोलन केले. तर क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला खामगाव शहरातही शेकडो युवक व नागरिकांनी मुंडन आंदोलन केले आहे.