फास्टॅगमध्ये बॅलन्स नसल्याच्या कारणावरून शिवसेना (शिंदे) खामगाव तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्यासह त्यांच्या पत्नीलाही मारहाण झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ७:४५ वाजता राष्ट्रीय महामार्गावर शेगाव तालुक्यातील तरोडा टोलनाका येथे घडली. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी बुधवारी टोलनाक्यावरील भूषण नामक कर्मचाऱ्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांनी पोलिसांत तक्रार दिली. ते मित्र व पत्नीसह अकोल्याहून पिंप्री गवळी गावाकडे येत होते. त्यावेळी तरोडा टोलनाक्यावर त्यांनी आपली गाडी (क्र. एमएच ०४ एचएम १७५०) फास्टॅग लेनमध्ये लावली. फास्टॅग स्कॅन केल्यानंतर भूषण नामक आरोपीने फास्टॅगमध्ये बॅलन्स कमी असल्याचे सांगितले. त्यावर बघे यांनी बॅलन्स असल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपी भूषण याने शिवीगाळ करून गाडी मागे घेण्याचे सांगत बॅलन्स टाकण्याचे म्हणाला. तसेच पैसे घेतल्याशिवाय गाडी सोडणार नाही, असे म्हटले. शिवीगाळ करण्याबाबत हटकले असता गाडीच्या खाली उतर मग दाखवतो, असे म्हणून बघे यांच्या शर्टची काॅलर धरून त्यांना खेचले. त्याचवेळी चेहऱ्यावर हातातील कड्याने वार केला. त्यामुळे बघे जखमी झाले. हे पाहताच त्यांचा मित्र मदतीसाठी धावून आला. त्यालाही आरोपीने मारहाण केले. प
तीला मारहाण होत असल्याचे पाहून बघे यांच्या पत्नी भांडण सोडवायला आल्या. आरोपीने त्यांना धक्का देत लोटपाट केली. आरोपीने दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याने टोलनाक्यावरील इतर कर्मचाऱ्यांनी वाद सोडवला. आरोपी भूषण हा सातारा जिल्ह्यातील असून त्याने बघे यांना पुन्हा टोलनाक्यावर दिसल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी वैद्यकीय अहवालावरून आरोपी भूषण याच्याविरोधात भादंविच्या कलम ३५४, ३५४ अ, ३२४, ३२३,२९४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पाेहेकाँ शेख चांद करीत आहेत.