योगेश फरपट
खामगाव : शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना शहर व तालुका आघाडीतर्फे लावण्यात आलेल्या स्वागत फलकावर युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषी जाधव व शिवसेना खामगाव महिला आघाडी प्रमुखांना डावलण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे खामगाव शहरामध्ये अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्वागतासाठी कार्यकर्ते थांबल्याचे दिसून आल्याने शिवसेनेतील फूट चव्हाट्यावर आली आहे.
शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा अकोला जिल्ह्यातून खामगाव मार्गे बुलढाणा येथे गुरुवारी दुपारी जात आहे. तत्पूर्वी खामगाव येथील बायपासवर आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेना पदाधिकार्यांतर्फे स्वागत फलक लावण्यात आले. या फलकावर शिवसेना महिला आघाडी प्रमुख इंदूताई राणे यांचा फोटो व नाव टाळण्यात आले. युवा सेना प्रमुखांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या स्वागत फलकावर बुलढाणा जिल्हा युवासेना प्रमुख ऋषी जाधव यांचाही उल्लेख टाळल्याने युवा कार्यकर्त्यामध्ये नाराजीचा सूर होता. याशिवाय जिल्ह्यातील एकही शिवसेना आमदारांचा फोटो स्वागत फलकावर दिसून आला नाही. बायपासवर शिवसेना महिला तालुका आघाडीप्रमुख इंदुताई राणे, खामगाव शहर प्रमुख सुनील अग्रवाल, संयोजक राहुल जाधव आदी उपस्थित होते तर काळेगाव फाट्यावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अवघ्या काही अंतरावर आदित्य ठाकरे यांचे स्वागत होणार असल्याने शिवसेनेतील फूट दिसून आली.