त्यानुसार राज्यात आता ६ जूनला भगवा ध्वज फडकावून ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव पं. खं. जाधव यांनी या विभागाअंतर्गत सर्व शासकीय ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांना याबाबत १ जून रोजी निर्देश जारी केले आहेत. यामध्ये ६ जून हा दिवस 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयाने या वर्षी संपूर्ण महाराष्ट्र भगवेमय होणार आहे.
भगवा स्वराज्यध्वज संहिता
शिवस्वराज्य दिनाला फडकविण्यात येणारा ध्वज ही उच्च प्रतीची सॅटीन असलेली भगवी जरीपताका असावी. हा ध्वज तीन फूट रुंद आणि सहा फूट लांब या प्रमाणात असावा; म्हणजेच लांबी ही रुंदीपेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा.
स्वराज्यगुढी करण्याची पद्धत !
६ जूनला सकाळी नऊ वाजता शिवशक राजदंडावर भगवा स्वराजध्वज बांधून घ्यावा. शिवरायांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करून स्वराज्याचा सार्वभौम मंगल कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करून रयतेची झोळी सुख, समृद्धी, समता व स्वातंत्र्याने भरली म्हणून शिवशक राजदंडाच्या वर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा 'सुवर्णकलश' बांधावा. त्यावर ‘शिवशक राजदंड स्वराज्यगुढी’ हे अष्टगंधाने लिहून त्यावर अक्षता लावाव्यात. नंतर पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी बांधावी. शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सरळ उभी करावी. तद्नंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणून सांगता करावी. दरम्यान, सूर्यास्ताला शिवशक राजदंड स्वराज्यगुढी खाली घ्यावी. भगवा स्वराज्यध्वज व्यवस्थित घडी करून ठेवून द्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.