खामगाव: पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुलाचा अर्ज भरण्यासाठी लाभार्थ्यांना आर्थिक मागणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिका प्रशासनात खळबळ उडाली असून, यासंदर्भात प्रकल्प व्यवस्थापन संस्थेस पत्र देण्यात आल्याचे समजते.
‘सर्वांसाठी घरे’ हे ब्रिद असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या लाभार्थ्यांसाठी चार भागांची वेगळी योजना असे या योजनेचे खास वैशिष्टे आहे. खामगाव शहरात २०१७- २०२२ पर्यंत ३५१९ घरकुलांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये सन २०१७-१८ या आर्थिक वर्षांसाठी ३५८ घरकुलांचे उद्दीष्ट ठरविण्यात असून, योजना पुर्णत्वास नेण्यासाठी मुंबई येथील संस्थेची प्रकल्प विकास सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थेने शहरातील विविध भागातील सर्वेक्षण आणि लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी ६०-६५ सर्वेक्षकांची नियुक्ती केली आहे. यापैकी बहुतांश सर्वेक्षकांकडून लाभार्थ्यांना पैशांची मागणी केली जात आहे. यासंदर्भात लाभार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.
पालिकेचे प्रकल्प व्यवस्थापन संस्थेस पत्र!
शहरातील विविध भागांचा सर्वे करून अर्ज भरून घेण्यासाठी सर्वेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई येथील प्रकल्प व्यवस्थापन संस्थेने ६५ सर्वेक्षक नेमले असून, या सर्वेक्षकांकडून लाभार्थ्यांना अर्जासाठी १०० ते १५० रुपयांची मागणी केली जात असल्याची नागरिकांची ओरड आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे सर्वेक्षकांच्या नावानिशी तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वेक्षक पालिका प्रशानाच्या रडारवर आले आहेत. दरम्यान, यासंदर्भात पालिका प्रशासनाकडून संबधीत प्रकल्प विकास संस्थेस पत्र देण्यात आले आहे. यासंदर्भात प्रकल्प विकास संस्थेच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
खामगावात सहा हजार अर्जाचे वितरण!
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुलासाठी शहरातील सहा हजाराच्यावर नागरिकांना अर्जांचे वितरण गेल्या महिना भराच्या कालावधीत करण्यात आले आहेत. यापैकी साडेतीन हजार अर्ज पालिकेकडे प्राप्त झाले आहेत. दरम्यान, अर्जासाठी सर्वेक्षकांकडून पैशांची मागणी करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
लाभार्थ्यांनी कुणालाही पैसे देण्याची गरज नाही. सर्वेक्षकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी आपणाकडे प्राप्त झाल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे.
- शोभाताई रोहणकार, बांधकाम सभापती, नगर परिषद, खामगाव.
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल लाभासाठी अर्ज नि:शुल्क उपलब्ध आहेत. अर्जासाठी कुणासही पैसे न देता, यासंदर्भातील तक्रारीसाठी थेट मुख्याधिकाºयांनी संपर्क साधावा. याप्रकाराची चौकशी करण्यात येईल.
- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.