लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : शहरातील एकाच कुटुंबातील सासू-सून व नातू यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याने एकीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दुसरीकडे या घटनेने समाजमन हळहळले आहे.या कुटुंबात आजी, दोन मुले, एक सून व दोन नातू असे सहा जण राहत होते. प्रथम एका मुलाला कोरोनाची लक्षणे दिसताच त्यांनी स्वत:ला शेतात विलगीकरण करून घेतले. परंतु, दरम्यान त्याचा संसर्ग आजी, त्यांचा दुसरा मुलगा, सून व एका नातवाला झाला. त्यामुळे पंचावन्न वर्षे वयाच्या सुनबाई व त्यांचा २३ वर्षे वयाचा मुलगा यांना शेगाव येथे खाजगी कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. आजी व दोन मुले यांच्यावर घरीच उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान दोन मुलांनी कोरोनावर मात केली. परंतु ८२ वर्षे वयाच्या आजींचा १० मे रोजी मृत्यू झाला.
आई व मुलाने घेतला एकाच दिवशी जगाचा निरोपआजीच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असतानाच बुधवार १२ मे रोजी ५५ वर्षे वयाच्या कुटुंबप्रमुख सुनबाई यांचे शेगाव येथे कोविड सेंटरमध्ये देहावसान झाले. त्यांचा अंत्यविधी शासकीय नियमाप्रमाणे शेगाव येथेच दुपारपर्यंत आटोपून कुटुंबीय जळगाव येथे सायंकाळी पोहोचले. त्याचवेळी त्यांचा २३ वर्षे वयाचा धडधाकट व धावपळ करणारा मुलगा गेल्याची बातमी या कुटुंबियांना मिळाली. त्याच पावली हे कुटुंब परत शेगाव येथे गेले. रात्री उशिरा मुलावर अंत्यसंस्कार करून परत आले. आई व मुलाचे निधन एकाच दिवशी झाले ही सर्व माहिती गुरुवारी शहरात वाऱ्यासारखी पसरली. सर्व समाजमन हळहळले. प्रतिबंधक उपाययोजना म्हणून नगरपरिषदेने नगरात किमान सॅनिटायझरची फवारणी करावी अशी जनतेची मागणी आहे.