मयूर गाेलेच्छा
लाेणार (जि. बुलढाणा) : वैज्ञानिकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवराच्या पूर्वेकडील बाजूस मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याचे पाहायला मिळाले आहे. याच भागातून शेगाव-पंढरपूर मार्ग जात असून, अवजड वाहनांच्या गतीमुळे किंवा या परिसरात वृक्षतोड झाल्याने कडा ढासळला असण्याची शक्यता असल्याचे खगोल विश्व संस्थेचे प्रमुख संशोधक मयूरेश प्रभुणे यांनी ‘लोकमत’शी बाेलताना सांगितले.
माती अस्थिर हाेऊन खाली सरकते
उथळ भूस्खलन अनेकदा कमी झिरपणाऱ्या मातीच्या वरच्या बाजूस मातीसह उतार असलेल्या भागात होऊ शकतात. वरची माती पाण्याने भरलेली असल्याने ती अस्थिर होऊन खाली सरकते, असे मयूरेश प्रभुणे यांनी सांगितले.
सतत होणाऱ्या जड वाहतुकीचा परिणाम
लोणार वन्यजीव अभयारण्य आणि अगदी सरोवराच्या काठावरून जाणाऱ्या शेगाव-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरून निरंतर जड वाहतूक सुरू असते.
मोठ्या स्वरूपाच्या अवजड वाहनाच्या गतीने निर्माण होणाऱ्या कंपणामुळे किंवा सरोवराच्या पूर्वेला ज्या ठिकाणी भूस्खलन झाले आहे, त्या ठिकाणी एखादे मोठे वृक्ष तोडले गेले असल्यास सरोवराच्या पूर्वेकडील ठिसूळ भाग कोसळण्याची शक्यता असल्याचे मत प्रभुणे यांनी व्यक्त केले.
हा प्रकार निरंतर होत असेल, तर चिंतेचा आणि गंभीर असल्याचेही ते म्हणाले. भूस्खलन होण्याची अनेक कारणे असू शकतात, याचे निरीक्षण करून ते सांगणे सोयीचे ठरेल, असे त्यांनी सांगितले.
जमिनीच्या ऱ्हासामुळे वनस्पतींद्वारे मातीचे स्थिरीकरण वारंवार होते. याव्यतिरिक्त, हवामानातील बदल आणि पर्यावरणावरील इतर मानवी प्रभावामुळे होणारे ग्लोबल वार्मिंग, नैसर्गिक घटनांची वारंवारता यामुळे भूस्खलनसारख्या घटना होतात.