लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपुर : मागील वर्षी ऑनलाईन नोंदणी तून वगळलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान जमा करण्यासाठी 26 डिसेंबरपासून शेगाव तहसील समोर सुरू असलेले उपोषण शासन स्तरावरून बेदखल असल्याने संग्रामपुर तालुक्यातील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
बुधवारी कळमखेळ येथील पाण्याच्या टाक्यावर चढून स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांनी शोले आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात 26 डिसेंबरपासून मागील वर्षीच्या ऑनलाइन नोंदणीतून डावललेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल १००० रुपये अनुदान बँक खात्यात जमा करण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे; परंतू शासनाने याकडे दुर्लक्ष करीत आडमुठी भुमिका घेतल्याने संग्रामपुर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. 31 डिसेंबर रोजी एसटी बसच्या काचा फोडण्यात आल्या होत्या तर मंगळवारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. परत स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असुन पाण्याच्या टाक्यावर चढून शोले आंदोलन केले.
मागील वर्षी शासनानेनाफेङ द्वारे तूर खरेदी केंद्र सुरू केले होते त्यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करण्यास सुरुवात झाली शेगाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदी करण्याकरीता लागणारे सर्व कागदपत्राची पुर्तता करीत टोकन सुद्धा घेतले. टोकन मिळाल्यामुळे ऑनलाईन नोंदणी झाल्याचे स्पष्ट झाले आज ना उद्या आपली तूर शासन मोजून घेणार या संभ्रमात सर्व शेतकरी होते; परंतु शासनाकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची तुर घरामध्ये पडून राहीली. त्यामुळे शासनाने ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १००० रुपये देण्याची घोषणा करून सुध्दा आजतागायत शासनाने शेतकऱ्यांना अनुदान न दिल्यामुळे शेतकरी रस्त्यावर आले. घोषणा करून मोकळे झालेल्या सरकारला जागे करण्याकरीता शेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपोषण सुरू केले सुरु असलेल्या उपोषणाची दखल आजतागायत घेण्यात आली. आधिच संग्रामपुर तालुक्यातील शेतकरी दुष्काळामुळे आर्थीक परीस्थितीने कमकुवत झाला. त्याला आर्थीक मदत देऊन बळ देण्याची गरज आहे; परंतू असे काही घडतांना दिसत नाही.उलट हक्काच्या पैशांसाठी शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागली आहेत. आंदोलनेही बेदखल होत असल्याने त्या निषेधार्थ बुधवारी संग्रामपूर तालुक्यातील कळमखेड येथे संतप्त शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केले.
या आंदोलनामध्ये संपर्कप्रमुख मोहन पाटील, संतोष गाळकर, सुनील अस्वार,शिवा पवार,विनोद मोरे सुनिल खंडेराव सह कार्यकर्ते सहभागी झाले होते.(तालुका प्रतिनिधी)