हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. २१-उन्हाळा सुरू झाल्याने सध्या शहरातील विविध चौकात सर्वत्र बर्फ गोल्याची दुकाने लागली आहेत. मुलांसह तरुण या बर्फगोल्यांचा आस्वाद घेत आहेत. मात्र, जिल्ह्यात एकही खाद्य बर्फाचा कारखाना नसून, सर्व ठिकाणी अखाद्य बर्फाचा वापर करण्यात येत असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यात येत आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागात शरीराला गारवा देणार्या विविध वस्तूंसह शेकडो बर्फ गोल्याचे ठेले दिसून येत आहेत. या ठेल्यावर बर्फ गोला खाण्यासाठी गरिबांसह श्रीमंताच्याही गाड्या उभ्या राहात असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, हा बर्फ गोला नसून, विषाचाच गोला आहे. कारण, या गोल्यात वापरला जाणार कुठलाही बर्फ खाण्यायोग्य नसून, तो औद्योगिक वापराचा आहे. खाद्य पदार्थ तपासणीच्या कोणत्याही प्रक्रियेतून न जाता, तो थेट खवय्यांच्याच गळ्याला लागत आहे. बर्फ गोल्यांच्या सर्रास विक्रीचा हा प्रकार आरोग्याच्या दृष्टीने भीतीचा गोळा आणण्याचाच प्रकार आहे. बर्फ गोला हा लहानग्यांपासून प्रौढांपयर्ंत आवडीचा असल्यामुळे उन्हाळा लागला, की गल्लोगल्लीत बर्फ गोलाविक्रेते नजरेस पडतात. नानाविध रंगांचे आइस गोले हे विक्रेते ग्राहकांना विकतात. मात्र, या गोळ्यातील हे रंग खाण्याचे आहेत की, रसायनांचे? तसेच प्रत्येकाच्या तोंडात भरविणार्या गोल्यात वापरला जाणारा बर्फ कोणता असतो, याबाबत कोणीही खात्री देऊ शकत नाही. अशुद्ध पाण्यापासून तयार बर्फाचे सेवन झाल्यास गॅस्ट्रो, डायरियासह पाण्यापासून होणारे आजार होण्याची ९0 टक्के भीती असते.रासायनिक रंगामुळे घशाचे विकारबर्फ गोल्यात वापरल्या जाणार्या रासायनिक रंग ही निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे व त्याचा खाद्य पदार्थात वापर केल्यामुळे घशाचे विकार होऊ शकतात. रासायनिक रंग, निकृष्ट दर्जाचे पाणी आणि सॅकरीनपासून गोला आणि आइस कँडी तयार केले जाते. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने खाण्याचे प्रमाणित रंग, साखर महागली आहेत. पेप्सी तयार करण्यासाठी त्यांचा वापर केल्यास उत्पादन खर्च वाढतो. त्याच्या तुलनेत रासायनिक रंग आणि सॅकरीनचा वापर केल्यास निम्म्या खर्चात पेप्सी तयार होत असल्यामुळे निर्माते सर्रास रासायनिक रंग आणि सॅकरीनचा वापर करतात. त्याचा वापर आइस गोल्यात सुद्धा करण्यात येतो.अखाद्य बर्फाचा वापरबर्फाचे उत्पादन करणार्या कारखान्यांत काही ठिकाणी दर्शनी भागात अखाद्य बर्फ म्हणून उल्लेख केलेला दिसतो. असे अखाद्य बर्फाचे कारखाने जिल्ह्यात जवळपास १३ आहेत. विशेष म्हणजे खाद्य बर्फाचा कारखाना एकही नाही. त्यामुळे अखाद्य बर्फ तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे पाणी वापरले जात असेल, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बर्फ मोठय़ा आकाराचा व्हावा व तो जास्त काळ टिकावा, यासाठी त्यावर मोठय़ा प्रमाणावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. हे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. ज्या बर्फाचे गारेगार गोले करून विकले जातात, त्या बर्फाचा मूळ वापर रुग्णालयांमध्ये औषधांचा अथवा सलाइनचा साठा करण्यासाठी होतो. मच्छीमार याचा वापर मासे ताजे राहण्यासाठी करतात. बर्फाचा सर्वाधिक वापर हा रासायनिक उत्पादने तयार करणार्या कंपन्यांमध्ये होतो. हाच बर्फ आपण आपली तहान भागविण्यासाठी वापरतो.
अखाद्य बर्फाचे जीवघेणे ‘गोले’!
By admin | Published: February 22, 2017 2:34 AM