गत काही दिवसांपासून बुलडाणा शहरासह जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहे. वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध निर्बंध लादले असून विविध आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शनिवारी सायंकाळपासून साेमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. तसेच संचारबंदी लागू करण्यात आली हाेती. रविवारी बुलडाणा शहरातील दुकाने बंद हाेती. तसेच आठवडी बाजारात शुकशुकाट हाेता. मात्र, मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरूच हाेती. शहरातील एकाही चाैकात पाेलीस कर्मचारी नव्हता. तसेच नागिरकांनाही मास्कचा विसर पडल्याचे दिसले. काेराेना रुग्णांची संख्या वाढत असली तरी नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. दरराेज जिल्ह्यात ३५० पेक्षा जास्त काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण निघत आहेत. जिल्हा प्रशासन काेराेनावर उपाययाेजना करण्यासाठी आदेश काढते. मात्र, त्या आदेशाची इतर विभागाकडून अंमलबजावणीच हाेत नसल्याचे चित्र आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई हाेत नसल्याने नागरिकही निर्ढावले आहेत. तसेच चाैकाचाैकांत विनाकारण फिरणाऱ्यांची चाैकशी करण्यासाठी पाेलीसच नसल्याने संचारबंदीतही नागरिकांचा मुक्त संचार सुरू असताे. वाढती काेराेना रुग्णांची संख्या पाहता नागरिकांनी काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
कारवाईचा केवळ दिखावाच
विनामास्क फिरणाऱ्यांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा नगरपालिका आणि पाेलीस प्रशासनाकडून दिखावा केला जाताे. पाेलीस स्टेशनसमाेर काही वेळासाठी कारवाई सुरू करण्यात येते. काही वेळानंतर ती बंद करण्यात येते. नगरपालिकेने पथके नेमली असली तरी ही पथके कुठे कारवाई करतात, हा संशाेधनाचा विषय आहे. केवळ चाचण्या वाढविण्यावरच प्रशासनाचा भर असल्याचे चित्र आहे.