कोरोनावर मात केल्यानंतर काही रुग्णांना बुरशीजन्य आजाराची लागण होते. त्यामुळे दात दुखणे, डोळ्यावर सूज येणे, नाकामध्ये दाह निर्माण होणे अशा तक्रारी जाणवतात. क्वचित प्रसंगी दात काढावा लागणे, डोळे निकामी होणे किंवा दृष्टी कमी होण्याचेही प्रकार घडतात. अपवादात्मक परिस्थितीत ही बुरशी मेंदूमध्ये गेल्यास रुग्ण गंभीर होण्याची शक्यता असते. त्यावेळी न्यूरोसर्जनचीही गरज पडते.
--जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचे संशयित रुग्ण :- १६
--औषधांची मागणी वाढली--
जिल्ह्यात या बुरशीजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून औषध व इंजेक्शनचीही मागणी वाढली आहे. जिल्ह्यात हे औषध उपलब्ध होत नसल्याने औषधांची घाऊक विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील ७ मेडिकल एजन्सीजने नागपूर येथील डेपोकडे अनुषंगिक औषधी मागणी केली आहे.
--नाक, डोळा, दात, जबड्याला फटका--
बुरशीजन्य आजारामुळे नाक, डोळा, दात व जबड्याला याचा त्रास होतो. सोबत नाकातील पोकळ हाडावाटे ही बुरशी शरीरात प्रवेश करते. त्यामुळे डोके दुखणे, डोळ्यांवर सूज येणे, नाकात दाह होणे, दात दुखतात. प्रामुख्याने अनियंत्रित मधुमेह असलेल्या व कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना याचा धोका अधिक असतो. त्यांच्या नसा मधुमेहामुळे एक प्रकारे संवेदनाहीन झालेल्या असतात आणि त्यातून हा आजार बळावतो.
--एका रुग्णास लागतात ४० डोस--
या आजाराने ग्रस्त रुग्णास किमान औषधींचे किंवा इंजेक्शनचे ४० डोस लागतात. ही औषधी टॅबलेट किंवा इंजेक्शन स्वरूपातही उपलब्ध आहे. लायपोझोमल अंम्पोटेरिसन बी ड्रग्जचे इंजेक्शन रुग्णास द्यावे लागते. हा कंटेन्ट असलेले अेामीफॉस, फॉसअम ५०, ॲम्बीलॉन ५० यासह जवळपास सहा प्रकारचे इंजेक्शन बाजारात उपलब्ध आहेत.
--कोट--
या आजाराचे दुसऱ्या लाटेदरम्यान ८ रुग्ण येऊन गेले आहेत. यातील चार जण बरेही झाले आहेत. पोस्टकोविड रुग्णांनी किमान २१ दिवसांनंतर दंत, नेत्र आणि कान, नाक, घसा डॉक्टरांकडे किंवा जनरल फिजिशियनकडून तपासणी करून घ्यावी.
- डॉ. सुमित दर्डा, दंतचिकित्सक, बुलडाणा
--कोट--
अनियंत्रित मधुमेह असलेल्या रुग्णांना हा आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे सर्वसाधारणपणे नियमित स्वरूपात पाण्याची वाफ घेतली जावी. आयोडिनचे दोन थेंब नाक स्वच्छ धुवावे. मिथिलीन ग्ल्यू टाकून पाण्याने नाक स्वच्छ धुतले तरी चालते.
- डॉ. जे. बी. राजपूत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, आयएमए बुलडाणा
--कोट--
मधुमेह असलेल्या तीन रुग्णांवर उपचार केले आहेत. मात्र या आजाराबाबत बरेच गैरसमज आहेत. घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ट्रिटमेंट वेळीच घेतल्यास धोका राहात नाही.
- डॉ. शोन चिंचोले, नेत्रतज्ज्ञ