गत काही दिवसांपासून तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासह चार प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांत बोराखेडी, धामणगाव बढे, पिंपळगाव देवी आणी पिंप्री गवळी यांचा समावेश आहे, तर ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळावा, या दृष्टिकोनातून प्राथमिक केंद्रांतर्गत येत असलेल्या उपकेंद्रावरसुध्दा लसीकरण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, येथील ग्रामीण रुग्णालयात जवळपास १ हजार २०० नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. बोराखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सात उपकेंद्रे आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना चाळीस गावे जोडण्यात आली आहेत. या ठिकाणी ४ फेब्रुवारीला लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे, तर ३० एप्रिलपर्यंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ हजार ४५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. धामणगाव बढे प्राथमिक आरोग्य केंद्राला २ हजार ४५० लसींचा पुरवठा करण्यात आला असून, धामणगाव बढे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १९ गावे समाविष्ट आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेल्या २ हजार ४५० लसी ३० एप्रिलपर्यंत लाभार्थींना देण्यात आल्या आहेत. पिंपळगाव देवी या प्राथमिक आरोग्य केंद्राला २ हजार ३८० लसीचा पुरवठा करण्यात आला होता. या प्राथमिक आरोग्य केंद्राला ६ उपकेंद्र तसेच २२ गावे जोडण्यात आली असून, ३० एप्रिलपर्यंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तथा उपकेंद्रांतर्गत मिळालेल्या २ हजार ३८० लसींचा उपयोग करून नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर पिंप्री गवळी या प्राथमिक आरोग्य केंद्राला २ हजार १०० लसी मिळाल्या होत्या. ३० एप्रिलपर्यंत येथील नागरिकांना या लसीचा लाभ देण्यात आला आहे अशाप्रकारे प्राप्त झालेल्या तालुक्यातील १२ हजार ५८० नागरिकांना येथील ग्रामीण रुग्णालय तथा प्राथमिक आरोग्य केंद्रातून लसीकरणाचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. परंतु मागील चार दिवसांपासून तालुक्यात लसी उपलब्ध नसल्याने लसीकरण ठप्प पडले आहे.
लसींचा तुटवडा; माेताळ्यात लसीकरण ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:56 AM