बुलडाणा: जिल्ह्यात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असून, पिकांना मात्र दमदार पावसाची गरज आहे. सर्वसाधारण पर्जन्यमानाच्या तुलनेत जिल्ह्यात आतापर्यंत ७३.१८ टक्के पाऊस झाला आहे. त्यामध्ये सर्वात कमी पाऊस देऊळगाव राजा व लोणार तालुक्यात आहे. या दोन्ही तालुक्यात ५० टक्क्यापर्यंत सुद्ध पाऊस न झाल्याने या तालुक्यातील पिकांची स्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सोयाबीन व कपाशी पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. या दोन्ही पिकांना दरवर्षी अत्यल्प पावसाचा फटका बसत आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे गतवर्षी शेतकºयांना शेतीसाठी लागलेला खर्चही भरून निघाला नाही. उत्पादनात आलेली घट यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावले. यावर्षी मृग नक्षत्र पूर्ण कोरडे गेल्यानंतर आद्रा नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. त्या पावसावर शेतकºयांनी पेरणी पूर्ण केली. मात्र काही भागात पुन्हा पावसाने ओढ दिली. त्यानंतर मध्यंतरी जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस झाला. परिणामी, संकटात सापडलेल्या पिकांना जीवनदान मिळाले. सध्या पावसाची आवश्यकता आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर बहुतांश ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७३.१८ टक्के म्हणजे ४८८.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वात कमी पाऊस देऊळगाव राजा तालुक्यात आहे. या तालुक्यामध्ये केवळ ४६.३८ टक्के म्हणजे ३०३.७ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ लोणार तालुक्यातही कमीच पाऊस आहे. या तालुक्यामध्ये ४८.७५ टक्के म्हणजे ३७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यात पाऊस समाधानकारक असला तरी सध्या पिकांना दमदार पावसाचीच आवश्यकता आहे.
जिल्ह्यात ४८८.७ मि.मी. पाऊस
जिल्ह्यात एकूण ४८८.७ मि.मी. पाऊस आतापर्यंत झाला आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात ६४९.६ मि.मी., चिखली तालुक्यात ४७७.६ मि.मी., देऊळगाव राजा ३०३.७, सिंदखेड राजा ३७२ मि.मी., लोणार ३५१.९, मेहकर ४१८, खामगाव तालुक्यात ४३५.८, शेगाव ५६३.२, मलकापूर ५५९.२, नांदुरा ५४९.५, मोताळा ४४१.२, संग्रामपूर ६६८.१, जळगाव जामोद तालुक्यात ५६३.७ मि.मी. पाऊस झाला आहे.