- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. परंतू या संतांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादीत नव्हे तर, भारतभर दिसून येते. महाराष्ट्रातील प्रमुख संतांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या मेहकरच्या श्वासानंद माऊलींनी गेल्या शतकात ‘गंगा बहती भली, साधू घूमता भला’ या म्हणीप्रमाणे काशीला संजीवन समाधी घेईपर्यंत अखंड संचार केला. श्वासानंद माऊलींच्या ९० वर्षापूर्वीच्या या भ्रमंतीला त्यांच्या भक्तवर्गांनी पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. समाजामध्ये जातीभेद, उच्चनीच, गरीब-श्रीमंत यांची मोठी दरी निर्माण झालेली असताना विविध जातीत जन्माला आलेल्या संतांनी ही विषमतेची दरी दूर करण्याचे मोठे काम केले. धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कामही या संत परंपरेकडून करण्यात आले. महाराष्ट्रात असे अनेक संत आढळून येतात. त्यातीलच एक प्रमुख संत श्वासानंद माऊली हे आहेत. मेहकर ही जन्मभूमी असलेले श्वासानंद माऊली उर्फ संत बाळाभाऊ महाराज पितळे यांना त्यांच्या धार्मिक कार्यामुळे महाराष्ट्राच्या धर्मक्रांतीचे प्रणेते म्हणूनही ओळखले जाते. मेहकरच्या श्वासानंद माऊलींनी १९२५ ते ३० च्या कालखंडामध्ये शिष्टमंडळींना सोबत घेऊन भक्तीमार्गाच्या प्रसारासाठी भारतभरच नव्हे तर नेपाळपर्यंत भ्रमंती केली. ही एक एैतिहासिक आणि दखलपा वेगळेपणा असलेली बाब आहे. ‘चरैवेती, चरैवेती’ या वेदमंत्राप्रमाणे त्यांनी काशीला संजीवन समाधि घेईपर्यंत अखंड संचार केला. श्वासानंद माऊलींनी काशि येथे संजीवन समाधी व प्रयाग येथे ‘करतल भिक्षा, तरूतल वास’ हे व्रत केले. चित्रकूट येथे गुहेमध्ये त्रिदंडी सन्यास, ओंकारेश्वर येथे दिव्य ग्रंथ तोंडी सांगितला. तर बद्रिनारायण येथे तो ग्रंथ शिष्याकरवी लेखनबद्ध केला. महेश्वर जंगलामध्ये तपश्चर्या, इंदूर येथे महाराणी अहिल्याबाई होळकरांचे राजवारस श्रीमंत मार्तंडराव होळकर हे यांचे शिष्य होते. त्यांच्या राजवाड्यात चातुर्मास, हिमालयात साधु-संतांच्या भेटी, नोपाळची राजधानी काठमांडू येथील राजघराण्याकडून ‘पार्थीव लिंग पूजनाचा’ सन्मान महाराजांना मिळाला. महाराजांच्या भ्रमंतीला उजाळा देण्यासाठी श्वासानंद माऊलींचे चौथे उत्तराधिकारी गुरूपिठाधिश अॅड. रंगनाथ महाराज पितळे यांच्या प्रेरणेने गुरूभक्तांनी मागील आठवड्यात सर्व स्थळांना भेटी दिल्या. या सर्व गावातील वयोवृद्धांनी त्यांच्या आठवणी अद्यापही जपलेल्या आहेत.
उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात भक्तवर्ग अधिकमेहकर येथील श्वासानंद माऊली यांचा भक्तवर्ग हा उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश मध्ये सर्वाधिक असल्याचे गुरूभक्तांनी सांगितले. काशिला महाराजांची संजीवन समाधी असल्यामुळे तो केंद्रबिंदू मानून पहिल्या टप्प्यात काशिच्या अलिकडील स्थळांना या गुरूभक्तांनी भेटी दिल्या. तर पुढील टप्प्यात काशीच्या पलीकडील स्थळांना भेटी देणार असल्याची माहिती गुरूभक्तांनी दिली. या भेटीदरम्यान महाराजंचे अनेक कार्य समोर आले.