गजानन कलोरे। लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : श्री संत गजानन महाराजांचा १0७ वा पुण्यतिथी उत्सव २६ ऑगस्ट रोजी परंपरेनुसार संतनगरीत हजारो भक्तांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. हभप श्रीरामबुवा ठाकुर यांचे सकाळी ७ ते ९ श्रींचे समाधी सोहळानिमित्त कीर्तन होणार आहे. या उत्सवात श्री गणेश यागास व वरूण यागास २२ ऑगस्टला आरंभ होवून २६ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वा. यागाची पुर्णाहूती व अवभृत स्नान व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील व विश्वस्त मंडळ व ब्रम्हवृंद यांच्या उपस्थितीत होईल तर दुपारी श्रींच्या मंदिरातून २ वा. कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते श्रींच्या रजत मुखवट्याचे पुजन होवून श्रींच्या पालखीचे रथ, मेणा, दिंड्या पताका टाळकरी, गज, अश्वासह नगर परिक्रमा निघेल. श्रींची पालखी नित्य मार्गाने शहरातून मार्गस्थ होत सायंकाळी श्रींच्या मंदिरात दाखल होईल. श्रींच्या पालखीचे शहरातून विविध संघटना व भक्तांच्यावतीने स्वागत केले जाणार असून सायंकाळी मंदिरात श्रींची महाआरती व टाळकरी यांचा आकर्षक रिंगण सोहळा व श्रींची आरती होणार आहे. रात्री ८ ते १0 हभप श्रीरामबुवा ठाकुर यांचे कीर्तन होणार आहे. २७ ऑगस्ट रोजी हभप श्रीधरबुवा आवारे मु. खापरवाडी यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन होईल व नंतर दहीहंडी गोपाळकाला कार्यक्रम होणार आहे.यानिमित्त श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सर्वत्र मंदिर परिसरात केळीचे खांब व तोरण लावण्यात येवून भक्तीमय वातावरण असून श्रींच्या नामघोषात भक्त तल्लीन होत श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात सहभागी होत आहेत. भक्तांच्या सोयीसाठी श्रींचे दर्शनसाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे. त्यात दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण मंडप, श्रींची गादी व पलंग तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्या भक्त निवासामध्ये नियमानुसार अल्पदरात राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे. संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता ही भक्तांना श्रींच्या प्रति आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे. भक्तांना कोणताही त्रास होवू नये यास्तव श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत. या उत्सव काळात सर्वतोपरी सोयीसुविधा संस्थानच्यावतीने पुरविल्या जात आहेत.शेगाव पोलीस स्टेशनच्यावतीने भक्तांच्या सेवेसाठी अतिरिक्त बंदोबस्त देण्यात आला आहे. यात पीआय २, अधिकारी २0, पोलीस कर्मचारी १२५, एलसीपी पथक, पीईपी १ पथक, बॉम्बशोधक १, पुरूष होमगार्ड ५0, महिला होमगार्ड १0 यांच्यासह पोलीस अधीक्षक यांच्या देखरेखीखाली अन्य अधिकारी व शहर ठाणेदार ढाकणे हे लक्ष देवून आहेत. असा राहील नगर परिक्रमा मार्गश्री गजानन महाराज मंदिरातून ढोलपुरी गेट, श्री गजानन चित्र मंदिर, जुने महादेव मंदिर, शितलनाथ महाराज धर्मशाळा माळीपुरा, प्रगटस्थळ येथे श्रींच्या पालखीचे आगमन प्रगटस्थळ पुजा, गढीजवळून बाजार रोड, बसस्टॅण्ड, मुख्य रोड, शिवाजी चौक, गांधी चौक, मार्ग संध्याकाळी श्रींचे मंदिरात दाखल होईल. यावेळी श्रींची आरती होईल.
श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाकरिता वाहन पार्किंग व्यवस्थाखामगाव रोडवरील श्री गजाननदादा पाटील कॉटन मार्केट नवीन मैदान, मुरारका हायस्कूल मैदान, गोमाजी महाराज पार्कींग, गजानन महाराज परिसर, कॉटन मार्केट जुने मैदान, नगर पालिका मैदान आदी ठिकाणी वाहनांची पार्कींग व्यवस्था केल्या गेली आहे.श्री गजानन सेवा समिती व्दारा श्रींच्या ऋषिपंचमी उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन अग्रेसन भवन येथे २५ व २६ रोजी सकाळी ६ वाजेपासून २६ पर्यंत अविरत महाप्रसाद वाटप सुरु राहील. शेगाव, नागपूर, अकोटचा भक्त परिवार श्री गजानन सेवा समितीव्दारे दरवर्षी ऋषिपंचमी, रामनवमी, प्रगटदिन या उत्सव काळात श्रींच्या भक्तांना महाप्रसादाचे वितरण करून आपली सेवा अर्पीत करीत असतो.
उत्सव काळात ३00 च्या वर भजनी दिंड्यांचे आगमनश्रींच्या पुण्यतिथी उत्सवात दुपारपर्यंत ३३५ भजनी दिंड्यांचे आगमन झाले होते. ही संख्या ५00 च्या वर जाण्याची शक्यता आहे. या भजनी दिंड्यांचे आनंद विसावा याठिकाणी आगमन होत आहे. यात नियमाची पूर्तता करणार्या भजनी दिंड्यांना संस्थानच्यावतीने भजनी साहित्य वाटप करण्यात येत आहे. यावर्षी २५ रोजी दुपारपर्यंत ७५ भजनी दिंड्यांना साहित्य वाटप करण्यात आले. तर २00 भजनी दिंड्या ह्या जुन्या होत्या तर ६0 भजनी दिंड्या प्रथम आल्या आहेत. अशा एकूण ३३५ भजनी दिंड्या संतनगरीत दाखल झाल्या आहेत.-