सिंदखेडराजा (बुलढाणा) : संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखी सोहळा पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर आहे. ५० दिवसांचा पायी प्रवास करून श्रींची पालखी रविवारी विदर्भात दाखल झाली़ मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील माळ सावरगाव येथे पालखीचे विदर्भ सीमेत उत्साहात स्वागत करण्यात आले.
२६ मे रोजी शेगाव येथून गजानन महाराजांच्या दिंडी सोहळ्याने पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवले होते. ३ जुलै रोजी पंढरपूर येथून दिंडीने शेगावसाठी परतीचा प्रवास सुरू केला. रविवारपर्यंत ५० दिवसांचा पायी प्रवास करून दिंडी विदर्भाच्या सीमेवर दाखल झाली. माळ सावरगाव घाटात नगर परिषदेच्या वतीने माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष काझी, भाजप प्रवक्ते विनोद वाघ, विष्णू मेहेत्रे, सीताराम चौधरी, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, तुळशीराम चौधरी, शिवाजी राजे जाधव, विजय तायडे, भगवान सातपुते, गणेश झोरे, शाम मेहेत्रे, नरहरी तायडे, संदीप मेहेत्रे, बुद्धू चौधरी, यासिन शेख, आरेफ चौधरी, नगरसेवक, विविध विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी श्रींचे फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत केले. माळ सावरगाव ग्रामस्थांनी जिल्हा सीमेवर तोरण उभारले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार केशव वाघ, युवराज राठोड, बालाजी सानप, श्रावण डोंगरे यांनी पोलिस दलाच्या वतीने पालखीचे स्वागत केले, तर नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, मंगेश कुलथे यांनी तहसील प्रशासनाच्या वतीने दिंडीचे स्वागत केले.
दिंडी सोबत ७०० वारकरीश्रींच्या पालखी सोहळ्यात ७०० वारकऱ्यांचा सहभाग असून बँड पथक, पाणी व्यवस्था, आरोग्य व्यवस्था पालखी सोबत करण्यात आली आहे.
आज बिबी येथे मुक्कामरविवारी सायंकाळी श्री रामेश्वर मंदिरात भोजन आटोपून पालखी जिजामाता विद्यालयात विसावणार आहे. आज, सोमवारी पहाटेच पालखी सोहळा येथून पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवणार आहे. आज पालखीचा मुक्काम लोणार तालुक्यातील बिबी येथे असणार आहे. दरम्यान, २४ जुलै रोजी पालखी सोहळा शेगाव येथे पोहोचणार आहे.
पालखीसोबत तीन अश्वपालखी सोहळ्यासोबत तीन अश्व असून शंकर, योगीराज आणि स्वामी अशी त्यांची नावे आहेत. महाराजांच्या या मूक सेवेकऱ्यांनीदेखील पायी प्रवास करून एक प्रकारे आपली सेवा दिली आहे. प्रत्येक गावात भाविकांनी या अश्वांचे मनोभावे दर्शन घेतले.