खामगाव: 'नाम घेता चाला आता पंढरीची वाट' या मंत्राचा जागर करीत आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास अंतिम टप्प्यात आहे. रविवारी सकाळी ८:३० वाजता श्रींची पालखी खामगावात दाखल झाली. श्रींची पालखी खामगावात दाखल होताच भाविकांनी 'गण गण गणांत बोते'चा गजर करीत श्रींच्या पालखीचे मनोभावे स्वागत केले.
श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने २६ मे राेजी सकाळी ७ वाजता श्रींच्या पालखीने ७०० वारकर्यासह पंढरपूर ५४ व्या पायीवारीसाठी प्रस्थान केले. आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर श्रींची पालखी भजनी दिंडी आणि वारकर्यासह ०३ जुलै रोजी परतीच्या प्रवासासाठी शेगावच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्यानंतर शनिवारी सायंकाळी श्रींच्या पालखीने आवार येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत मुक्काम केला. रविवारी पहाटेच खामगावच्या दिशेने टेंभूर्णा मार्गे मार्गक्रमण केले. रविवारी सकाळी ८:३०वाजता श्रींची पालखी बाळापूर बायपासवर पोहोचली. त्यानंतर बाळापूर फैल नजीकच्या हनुमान व्हीटामीन येथे अल्पविश्रांतीसाठी दाखल झाली.
यावेळी खामगावातील भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी आणि पालखीच्या स्वागतासाठी एकच गर्दी केली. मनोभावे खामगावात श्रींच्या पालखीचे स्वागत झाले. श्रींच्या पालखीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्यावतीने खामगावात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.