लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशात ‘लॉकडाऊन’ सुरु आहे. यामुळे गुरुवारी, २ एप्रिलरोजी संतनगरीत यावेळेस श्रीराम नवमी उत्सव साजरा होवू शकला नाही. अनेक वर्षापासूनची श्रीराम नवमी उत्सवाची परंपरा पहिल्यांदाच खंडीत झाली आहे. केवळ पुजाऱ्यांच्याहस्ते सकाळी विधीवत पूजन झाले.श्री गजानन महाराज मंदिरात दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव साजरा होत असतो. १६ मार्च पासून मंदिर सुद्धा पूर्णत: बंद आहे. उत्सवाला जिल्ह्यातूनच नव्हेतर या उत्सवात भक्तांची मांदियाळी पहायला मिळते. या उत्सवास २८ मार्चपासून सुरवात होणार होती. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या व वाढता संसर्ग लक्षात घेता शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरातील ‘श्रीं’ची दर्शन सुविधा ३१ मार्चपर्यत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले. त्यामुळे उत्सवास सुरुवात होवू शकली नाही. याशिवाय २ एप्रिलरोजी आयोजित श्री रामनवमी उत्सव सुद्धा स्थगित करण्यात आल्याचे मंदिर प्रशासनाच्या वतीने जाहिर करण्यात आले. रामनवमीला ‘श्रीं’च्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यज्ञ, भजन, किर्तन, नगरपरिक्रमा आदी कार्यक्रम पार पडतात.डोळ्याचे पारणे फेडणारा हा उत्सव असतो. या उत्सवात १५०० हून अधिक दिंड्या, लाखो भाविक सहभागी होतात. मात्र कोरोनाने उत्सवावर विरजन पडले. अनेक भाविकांनी आपल्या घरातच ‘श्री राम चरित मानस’ या ग्रंथाचे पठण केले. शेगावप्रमाणेच खामगाव, मलकापूर, कमळनाथ (पिंपळगाव राजा), नांदुरा यासह जिल्हयातील अनेक ठिकाणी होणारा श्रीराम नवमी उत्सव साजरा होवू शकला नाही. सण उत्सवावरही पडले विरजणगुढीपाडवा सण २५ मार्च रोजी होता. मात्र याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन केले. यामुळे गुढीपाडव्यानिमित्त अनेक ठिकाणचे कार्यक्रम रद्द झाले. याशिवाय आज २ एप्रिल रोजी श्री रामनवमीचे कार्यक्रम सुध्दा स्थगीत करण्यात आले. येत्या ६ एप्रिलला महावीर जयंती तर ८ एप्रिलला हनुमान जयंती आहे. हे उत्सव सुध्दा स्थगीत राहणार असल्याने भक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
श्री रामनवमी उत्सवाची शेगावातील शेकडो वर्षांची परंपरा खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 11:58 AM