जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : वऱ्हाड पंढरी म्हणून नावलौकिक पावलेल्या सखारामपूर (इलोरा) येथील श्री संत सखाराम महाराज पुण्यतिथी यात्रा महोत्सव या वर्षी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. यामुळे वऱ्हाडात प्रसिद्ध असणाऱ्या या शुद्ध वारकरी यात्रेची ७५ वर्षांची परंपरा या वर्षी खंडित होणार आहे. वसंत पंचमीसह तीन दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय संस्थांचे अध्यक्ष तुकाराम महाराज सखारामपूरकर यांनी घेतला आहे.
श्री संत सखाराम महाराज यांनी तब्बल ६० वर्षे पायी फिरून कीर्तनाच्या माध्यमातून वऱ्हाडसह खान्देशात वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. त्यामुळे त्यांच्या वैकुंठ गमनानंतर वसंत पंचमीला इलोरा येथे त्यांचा पुण्यतिथी महोत्सव वारकरी दिंड्यांच्या उपस्थितीत पार पडू लागला. गुरुवर्य श्रीराम महाराज यांनी यात्रा महोत्सवाला विस्तारित रूप दिले. त्यामुळे सध्या बुलडाणा, जळगाव खान्देश, अमरावती, अकोला व वाशिम या जिल्ह्यांतून सुमारे दोनशे वारकरी दिंड्या व पन्नास हजार भाविकांच्या उपस्थितीत हा पुण्यतिथी यात्रा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. परंतु या वर्षी कोरोनामुळे गत ७५ वर्षांची ही यात्रा महोत्सवाची परंपरा खंडित होणार आहे.
तीन दिवस मंदिर राहणार बंद
मंगळवार १६ फेब्रुवारी वसंत पंचमी पुण्यतिथी दिनी श्री संत सखाराम महाराज मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सोमवार १५ व बुधवार १७ असे दोन दिवससुद्धा मंदिर बंद राहणार आहे. एकूण तीन दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी आपल्या घरीच श्री संत सखाराम महाराजांचे नामस्मरण करावे, असे मंदिर संस्थानच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.
दिंड्यांचा मुक्कामसुद्धा रद्द
या वर्षी फक्त पाच वारकऱ्यांची दिंडी येथे १० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत टप्प्याटप्प्याने हजेरी लावून निघून जाणार आहे. सर्व दिंड्यांचा येथील मुक्काम रद्द करण्यात आला आहे. बाकी काकड आरती, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम मात्र मंदिरात कोरोनाचे नियम पाळत साजरे केले जाणार आहेत.