लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोमवारी सकाळी खामगावात आगमन झाले. रविवारी आवार येथील मुक्काम आटोपल्यानंतर संत गजानन महाराजांची पालखी सोमवारी खामगावकडे मार्गस्थ झाली. वाटेत श्रींच्या पालखीचे हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे रवाना झाली. सुमारे एक महिन्यांचा प्रवासानंतर श्रीच्या पालखीने आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर श्रींच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. दरम्यान, ही पालखी मेहकर मार्गे खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथे दाखल झाली. त्यानंतर आवार येथे मुक्कामानंतर सोमवार ५ आॅगस्ट रोजी पहाटेच पालखी तेथून खामगावकडे मार्गस्थ झाली. सकाळी ७.४५ वा. पालखीचे खामगावात आगमन झाले. यावेळी खामगावातील हजारो भाविकांनी श्रींच्या पालखीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले.
श्रींच्या पालखीचे खामगावात आगमन; भाविकांनी घेतले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 1:44 PM