नवी मुंबई येथील वाशी टोल नाका या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एका मंत्र्यांच्या आवाजातील अनेक व्हाईस कॉल संभाषण व्हायरल झाल्याने संशय वाढत आहे; परंतु सरकारकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने मृत पूजा चव्हाण हिला न्याय मिळालाच पाहिजे, त्या मंत्र्याची हकालपट्टी करून कारवाई करा, या मागणीसाठी भाजपा महिला मोर्चाद्वारे राज्यभरात 'चक्का जाम आंदोलन' करण्यात आले. या अंतर्गत वाशी टोलनाका, नवी मुंबई येथील चक्का जाम आंदोलनाची जबाबदारी आ. श्वेता महाले यांच्यावर सोपविण्यात आली होती. दरम्यान, आ.महाले यांच्या नेतृत्वात सकाळपासूनच भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकारी टोलनाक्यावर चक्का जाम आंदोलन सुरू केल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. आ.महाले महिला पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले. या पश्चात मोजक्या पाच महिला पदाधिकाऱ्यांसमवेत आ.महाले यांनी वाशी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांना निवेदन दिले. या आंदोलनात आ.महाले यांच्यासह नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र बा. घरत, महिला मोर्चा अध्यक्ष दुर्गा ढोख, माजी अध्यक्ष वर्षा भोसले, प्रदेश सदस्य कल्पना शिंदे, महामंत्री कल्पना छत्रे, माजी नगरसेविका विजया घरत, जिल्हा उपाध्यक्ष राजाराम पाटील, मंडळ अध्यक्ष सुरेश अहिवले, वार्ड अध्यक्ष नारायण पाटील, युवा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, उपाध्यक्ष अविनाश भगत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते, अशी माहिती आ.महाले यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
वाशी टोल नाक्यावर श्वेता महालेंना अटक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 5:07 AM