चिखली : तालुक्यातील वळती येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम काम तातडीने सुरू करावे यासाठी ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर उपोषण आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, आमदार श्वेता महाले यशस्वी मध्यस्थी केल्याने या आंदोलनाची सांगता झाली आहे.
गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने सुरू करून गावाच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटावा, यासाठी ग्रा. पं. पदाधिकारी व ग्रामस्थांनी २२ मार्चला पाण्याच्या टाकीवर उपोषण सुरू केले होते. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार देऊन आंदोलनाचा इशारादेखील देण्यात आला होता. मात्र, संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे सरपंच उज्ज्वला सुनील चिंचोले, उपसरपंच शे. अस्लम, शे. हमीद व ग्रा. पं. सदस्य सुनील चिंचोले, भारत गायकवाड, मोसीम खाँ, मंदा हिवाळे, राधाबाई जगताप, दुर्गा धनवे, तबस्सूम परविन, उबेद पटेल यांनी पाण्याच्या टाकीवर हे उपोषण चालविले होते. त्याची दखल घेत आमदार श्वेता महाले यांनी आंदोलकांची भेट घेतली. दरम्यान, आ. महालेंनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी वारे यांच्याशी याबाबत चर्चा केली असता वारे यांनी १५ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आ.महाले यांच्या हस्ते उपोषण सोडविण्यात आले. यावेळी पं. स. सभापती सिंधू तायडे, उपसभापती शमशाद पटेल यांची उपस्थिती होती.