बुलडाणा जिल्हा सलग दोन आठवडे पहिल्या स्तरात राहिल्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये वनपर्यटन सुरू करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला होता. त्यासंदर्भातील कार्यवाहीही सुरू झाली होती. त्यातच राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यांत तिसऱ्या स्तरातील निर्बंध कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातही निसर्ग पर्यटन सुरू ठेवावे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. परिणामस्वरूप आता वन्यजीव विभागाने जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांना याबाबत मार्गदर्शक सूचना देण्याबाबत पत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.
मधल्या काळात कोरोनामुळे बहुतांश ठिकाणचे वनपर्यटन बंदच होते. ते सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुन्हा तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. त्यामुळे याचा नेमका यावर काय परिणाम होईल, याबाबत स्पष्टता यावी म्हणून आता हा प्रपंच आहे.