साखरखेर्डा : काेराेनाची तिसरी लाट तज्ज्ञांनी वर्तवली आहे़ त्यामुळे, काेराेनाविषयक नियमांचे पालन करूनच पाेळा सण साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले हाेते़ या आवाहनाला साखरखेर्डा येथे प्रतिसाद देत साध्या पद्धतीने सण साजरा केला़
साखरखेर्डा, सवडद, गुंज, वरोडी, मोहाडी, राताळी, शिंदी, पिंपळगाव, सोनारा, शेंदुर्जन, गोरेगाव, उमनगाव, बाळसमुद्र येथे मारोतीच्या पारावर किंवा वेशीत पोळा सण साजरा करण्याची प्रथा आहे. कोरोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी शासनाने पोळा सण घरीच साजरा करावा, असे आवाहन केले होते. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येक गावात सोमवारी पोळा सण शेतकऱ्यांनी घरीच साजरा केला. उमनगाव येथील प्रगतिशील शेतकरी तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे आणि पाच भावंडांनी घरीच बैलांची पूजा करून पोळा सण साजरा केला. शिंदी येथेही पंजाबराव हाडे, मदन हाडे, अशोक खरात राताळी येथे विठ्ठल गायकवाड, भानुदास लव्हाळे, शेंदुर्जन येथे जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव देशमुख, तांदूळवाडी येथे गजानन शेळके यांनी बैलांची पूजा करून सण साजरा केला़