- नीलेश जोशी बुलडाणा : १७ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे हे आमने सामने उभे ठाकले आहेत. दोघांच्या दृष्टीनेही लोकसभा निवडणूक त्यांचे राजकीय भवित्वय ठरवणारी असली तरी आपआपल्या पारंपारिक बालेकिल्ल्यात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठीही दोघांमध्ये संघर्ष सुरू आहे.मेहकर हा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचा बालेकिल्ला आहे तर आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघ बालेकिल्ला आहे. २०१९ च्या निवडणुकीत आपल्या बालेकिल्ल्यात उलट फेरफार होऊ नये याची काळजी दोघांकडूनही घेतली जात आहे. २०१९ ची निवडणूक दोघांसाठी काट्याची टक्कर असली तरी अशा प्रसंगी आपआपले बालेकिल्ले आपणास तारु शकतात ही दोघांची भूमिका आहे. २००९ नंतर या दोघांमध्ये पुन्हा एकदा लढत होत आहे.२००९ च्या निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेड राजा या आपल्या बालेकिल्ल्यात १४ हजार ९०८ मतांचे मताधिक्य घेतले होते तर बुलडाणा आणि मेहकर विधानसभा मतदार संघात विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना जवळपास बरोबरीत रोखले होते. मात्र जळगाव जामोद आणि खामगाव आणि काही प्रमाणात चिखलीने मताधिक्य दिल्याने खा. प्रतापराव जाधव यांची नौका २००९ मध्ये तरली होती.२०१४ मध्ये तर मोदी लाटेच्या भरवशावर त्यांनी विक्रमी एक लाख ५९ हजार ५७९ मतांनी आघाडी घेत विजय साकारला होता. ही बाब पाहता लोकसभा निवडणुकीच्या सहाही विधानसभा मतदार संघात त्यांनी २६ हजार ५७२ सरासरी मते घेत विजयाची गुढी उभारली होती.मात्र २०१४ प्रमाणे यावेळची स्थिती राहील कि नाही हे तुर्तास सांगता येणार नाही. मात्र २००९ ची आकडेवारी पाहता बुलडाणा, मेहकर येथे युती व आघाडीला समसमान मते मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे अन्य विधानसभा मतदार संघात आपली व्युहरचना ते कशा पद्धतीने मताधिक्य वाढविण्यासाठी आखतात याकडे लक्ष लागून आहे.प्रतापराव जाधव यांना बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, मोताळा या चार शहरांमध्ये २०१४ मधे मताधिक्य मिळाले होते. तर बालेकिल्ल्यातील मेहकर शहर, लोणार शहरात जवळपास दोन हजार मतांचा फटका जाधव यांना बसला होता.डॉ. राजेंद्र शिंगणे यांना २००९ च्या निवडणुकीत सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात १४ हजार ९०८ मतांचा लीड मिळाला होता तर बुलडाणा आणि मेहकर विधानसभा मतदार संघात ते जवळपास समसमान मतावर जाधव यांना रोखण्यात यशस्वी झाले होते.बळीराम सिरस्कार हे प्रथमच बुलडाणा लोकसभा मतदार संघता निवडणूक लढवत आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदार संघाचे ते आमदार आहे. त्यांना जळगाव जामोद व खामगाव विधानसभा क्षेत्रातून जनाधार मिळण्याची शक्यता आहे.
जाधवांसाठी मेहकर तर शिंगणेंसाठी सिंदखेड राजात मताधिक्य महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:52 PM