सिंदखेड राजा : काळापाणी मध्यवर्ती रोपवाटिकेला सध्या अवकळा आल्याचे चित्र आहे. चोहीकडे गवत वाढले असून बगिच्यातील नामवंत जातीचे गुलाब दिसून येत नाही. सर्व बाग वाळून गेल्याने बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली आहे. नर्सरीच्या संवर्धनाकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना २०११-१२ व २०१२-१३ अंतर्गत वनउद्यान, वनपर्यटन, इको-टुरिझममार्फत १३ व्या वित्त आयोगांतर्गत येथे पाच वर्षांपूर्वी २ कोटी रुपयांचे काळापाणी नर्सरीमध्ये विविध कामे करण्यात आली. राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळी असलेले पर्यटन वाढावे, जिजाऊ भक्त, प्रवासी व सर्वसामान्य नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात जाता यावे म्हणून बगिच्या, बाग, अंतर्गत रस्ते, ध्यान धारणा केंद्र यासारख्या असंख्य बाबीचा निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांचा आनंद घेता यावा म्हणून शासनाने वनविभागांतर्गत भरभरून निधी दिला. १३ व्या वित्त आयोगामार्फत झालेल्या कामांमध्ये विहीर खोदणे व बांधणे, सिमेंट बंधारा तयार करणे, झाडा सभोवताली ओटे बांधणे, पॅगोडा बांधणे, तारेचे कुंपण तयार करणे, मेडिकल स्टोअर्स बांधणे, ग्रीन हाऊस तयार करणे, लहान मुलांची खेळणी, सोलर लॅम्प बसविणे, औषधी वनस्पती तयार करणे यासारख्या कामासाठी शासनाने सढळ हाताने तब्बल २ कोटी रुपयांचा भरभरून निधी दिला. मात्र त्याचे फलित झाल्याचे दिसत नाही. त्यावेळी करण्यात आलेल्या विविध विकासकामे व वनसंपदा यांचा सांभाळ करण्यास वनविभाग अपयशी झाला असल्याचे दिसून येत आहे. शेकडो गुलाबाच्या झाडामुळे व फुलांमुळे फार मोठे वैभव प्राप्त झाले होते. मात्र आता तेथे झाडे नसल्यामुळे उदासीनता आली आहे.
काळापाणी नर्सरी मधील गवत काढण्यासाठी निधी उपलब्ध नाही. शासनाने निधी दिल्यानंतर मजूर लावून गवत काढण्यात येईल. पाणी उपलब्ध नसल्यामुळे गुलाब बाग जळून गेली आहे. - जी. के. कायंदे, वनपाल