लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : परिसरात आतापर्यंत सर्वसाधारण पाऊस झाला असून, गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अंढेरा गावासह, सेवानगर, पिंप्री आंधळे, मेंडगाव, बायगाव बु., पाडळी शिंदे, शिवणी आरमाळ, सावखेड नागरे या गावासह परिसरात सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर ही पिके पावसाअभावी सुकू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सुरुवातीला परिसरात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी महागडे बी. बियाणे, खते खरेदी करून संपूर्ण पेरणी केली. जून महिन्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील पिकांची वाढ जोमाने झाली. सध्या सगळीकडे पिके बहरून डोलायला लागल्याने शेतकरी वर्ग आनंदात असताना अचानक पावसाने दीर्घ दांडी मारल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे. पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने पिके पिवळी पडू लागली असून, पिकांचे पाते झडणे, वाढ खुंटणे यासह पिके सुकू लागली असून, लवकरात लवकर पाऊस न आल्यास शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार असून, शेतकऱ्यांच्या समोर आर्थिक प्रश्न उभा असणार आहे. सोयाबीन, मका, उडीद, मूग या पिकांची मुळे जमिनीत खोलवर असल्याने या पिकांना सतत पाण्याची आवश्यकता असते. शेतकऱ्यांनी पिकांना वाचविण्यासाठी आपआपल्या परिने सिंचनाचे पाणी देणे सुरू केले असून, खरिपाचा पेरा मोठा असल्याने दमदार पाऊस न झाल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या १ ते २ हप्त्यात पावसाने हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांच्या चिंतेत फार मोठी भर पडणार आहे. वन्य प्राणी बनले शेतकऱ्यांची डोकेदुखी!अंढेरासह परिसरातील सोयाबीन, तूर, मका, उदीद, मूग ही पिके सर्वसाधारण असून, परिसरातील वन्य प्राणी, हरिण, रोही पिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, वन्य प्राण्यांचे मोठे कळप असल्याने शेतकऱ्यांची उभी पिके फस्त करीत आहेत, तरी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अंढेरासह परिसरातील शेतकरी वर्ग करीत आहे.
अंढेरासह परिसरातील पिके पावसाअभावी सुकू लागली!
By admin | Published: July 12, 2017 12:52 AM