दरम्यान, मुख्य पुलासह राहेरी गावाजवळून जाणारा जुना नागपूर डाक लाईन हा वळण रस्ता व वळण रस्त्यावरील नदीवरील पुलाचे काम सध्या सुरू आहे. तीन महिन्यांत हे काम संपवून मुख्य पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या भागातील नागरिकांची भावना लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून जुन्या पुलाचे नूतनीकरण व नवीन वळण रस्ता, पुलासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.
जालना ते वर्धा पुढे नागपूर जाणारा हा रस्ता २०१८ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे तेव्हापासून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती राष्ट्रीय प्राधिकरणाकडून करण्यात येते. दरम्यान, राहेरी पुलासाठी निधी मजूर झाल्यानंतर राष्ट्रीय प्राधिकरणाने पुन्हा हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहे. निविदा प्रक्रिया सार्वजनिक विभागाने पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
मुख्य पुलाच्या कामासाठी ४.२४ कोटी रुपयांचा निधी दिला गेला आहे. वळण रस्ता व त्यातील पूल या कामांसाठी ३ कोटी ९४ लाख रुपये तर अन्य नळकांडी पूल व इतर कामांसाठी १२ लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
--नागरिकांनी सहकार्य करावे--
जुना नागपूर डाक लाईन रस्ता गेल्या अनेक वर्षांत दुर्लक्षित आहे. नवीन वळण रस्ता याचमार्गे केला जात आहे. या रस्त्यावर अनेकांच्या जमिनी आहेत; परंतु जुना रस्ता मोकळा करून घेण्यासाठी बांधकाम विभाग मोजणी प्रक्रिया राबविणार असल्याने या कामात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बांधकाम विभागाचे शाखा अभियंता डी. यु. शेळके यांनी केले आहे.
--जुने पिलर नवीन ढाच्या--
राहेरी येथील मुख्य पूल गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. हा पूल जड वाहतुकीसाठी अयोग्य असल्याने आतापर्यंत तीनवेळा हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सध्या देखील हा पूल जड वाहतुकीसाठी बंद आहे. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याचे सांगण्यात येते; परंतु या ऑडिटमध्ये नेमके काय दडलेले आहे याचा उलगडा कधीच झाला नाही. त्यामुळे या ऑडिटबद्दल शंका उपस्थित केली जाते. अर्थात जीवितहानी होऊ नये हाच या मागचा उद्देश आहे, असे असले तरीही आता पुलाचे काम ज्या पद्धतीने होणार आहे त्याची उत्तरे मिळणे अपेक्षित आहेत.
राहेरीचा मुख्य पूल जर नादुरूस्त आहे? तर जुने पिलर कायम ठेवून फक्त वरचा ढाचा का बदलला जात आहे?
पुलाची सध्याची उंची ही नदीला येणाऱ्या पुरामुळे वाढवलेली आहे. आता उशाशी धरण असताना या पुलाची उंची कमी करण्यात का येत नाही? जे जुने पिलर कायम ठेवले जाणार आहे ते मजबूत आहेत आणि नवीन ढाचा पेलू शकतील इतके सक्षम आहेत का?
जालना-नागपूर या रस्त्याची कामे सध्या सुरू आहे. रस्ता काही मीटर वाढविला जात आहे तर मग पुलाची रूंदी वाढविण्याचे प्रावधान का नाही? असे प्रश्नही जनसामान्यांना पडले आहेत.