माेताळा तालुक्यात साडेतीन हजार बाधित
माेताळा : जिल्हाभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ त्या पार्श्वभूमीवर मोताळा तालुक्यात १५ मे पर्यंत ३ हजार ५८१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. इतर तालुक्यांपेक्षा कमी प्रमाण आहे. मोताळा तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत शंभरी पार करण्याचे प्रमाण हे नगण्य आहे.
जिजामाता साखर कारखाना सुरू करण्याची मागणी
दुसरबीड : येथे असलेला जिजामाता साखर कारखाना हा शेतकऱ्यांसाठी कामधेनू आहे. शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.
खावटी अनुदानापासून लाभार्थी वंचित
बुलडाणा : आदिवासी विकास विभाग यांनी काढलेल्या ९ सप्टेंबर २०२०च्या शासन निर्णयान्वये अतिमागास जमाती व पारधी परित्यक्ता, विधवा, कामगार, नरेगा मजूर वर्ग यांना खावटी अनुदान प्रति कुटुंब चार हजार रुपये व दोन हजार रुपये रक्कम तत्काळ देण्याची मागणी भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गजानन सोळंके यांनी केली आहे.
लसीकरण केंद्रात एकच गर्दी!
मेहकर : शहरात दिवसेंदिवस कोरोना विषाणू रुग्णांची संख्या वाढत असून, येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर लसीकरण घेणाऱ्यांची एकच गर्दी होत आहे. येथे सर्रास सर्व नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
अंजनी येथे तीव्र पाणीटंचाई
मेहकर : तालुक्यातील अंजनी येथे गत काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील पाणीटंचाईकडे गावपुढारी आणि सचिव दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून येथील पाणीटंचाई निर्मूलनासाठी प्रयत्न व्हावेत.
हॉटेलबंदीने हिरावला महिलांचा रोजगार
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व हॉटेल महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील हॉटेलमध्ये पोळी, भाकरी करण्यासाठी काम करत असलेल्या महिलांचा रोजगार हिरावला गेला.
कोरोनामुळे आठवडी बाजार बंद
धामणगाव बढे : दिवसेंदिवस जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार बंद केले आहेत. आठवडी बाजार बंद झाल्याने शेतकऱ्यांपुढे भाजीपाला विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जंतुनाशक फवारणी करण्याची मागणी
किनगाव राजा : विविध वस्त्यांमध्ये जंतुनाशक द्रावणाची फवारणी करावी, अशी मागणी संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने निवेदनातून करण्यात आली. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचेही निवेदनात म्हटले आहे.
खिळेमुक्त अभियान राबविण्याची मागणी
बुलडाणा : बुलडाणा-खामगाव, बुलडाणा-मोताळा, बुलडाणा-चिखली, बुलडाणा-औरंगाबाद रस्त्यांवरील झाडे वाचविण्यासाठी खिळेमुक्त अभियान राबविण्याची मागणी हरित सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
निकृष्ट दर्जाच्या मक्याचे वितरण
सुलतानपूर : परिसरातील स्वस्त धान्य दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या मक्याचे वितरण केले जात आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वितरण त्वरित थांबवावे, अशी मागणी विनोद कसबे यांनी केली आहे.